![]()
सीना-माढा उपसा जलसिंचन योजनेचे आवर्तन सुरू होऊन तीन महिने उलटले, तरी माढ्यातील मणकर्णा ओढ्यात पाणी सोडले जात नसल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला आहे. वारंवार आंदोलने आणि निवेदने देऊनही पाणी मिळत नसल्याच्या निषेधार्थ सोमवारी माढा शहरात नगरपंचायतीच्या वतीने दोन तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. तर सर्वपक्षीय नेत्यांच्या नेतृत्वाखाली हलगी नाद मोर्चा काढून तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. अखेर पाटबंधारे विभागाने ८ नोव्हेंबरपासून पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले. सीना-माढा उपसा जलसिंचन योजनेचे आवर्तन सुरू असतानाही मणकर्णा ओढ्यात पाणी सोडण्याच्या मागणीकडे पाटबंधारे विभाग दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. यापूर्वीही अनेकदा आंदोलने करून निवेदने देण्यात आली; मात्र प्रत्यक्ष पाणी मिळत नसल्याने नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली. माढ्याच्या नगराध्यक्षा अॅड. मिनल साठे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकात तब्बल दोन तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. दुसरीकडे भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना शिंदे गटासह विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील मुख्य रस्त्यावरून हलगी नाद मोर्चा काढला. ‘पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. मोर्चा तहसील कार्यालयासमोर पोहोचल्यानंतर तेथे धरणे आंदोलन करून पाटबंधारे विभागाच्या नियोजनशून्य कारभाराचा निषेध करण्यात आला. माढेकरांना जाणीवपूर्वक पाण्यापासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. उपनगराध्यक्षा कल्पना जगदाळे आणि सभापती वंदना लंकेश्वर यांनी मनोगत व्यक्त करताना, माढेकरांना प्रत्येक मूलभूत सुविधेसाठी आंदोलन करावे लागत असल्याची खंत व्यक्त केली. दरम्यान, महिला आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेत टेंभुर्णी पाटबंधारे विभागाचे अधिकारी मंजुनाथ तुंबळ यांना घेराव घातला. मणकर्णा ओढ्यात तातडीने पाणी सोडण्याची मागणी करत पाणी मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. माढ्याचे सहायक पोलिस निरीक्षक रोहित शिंदे यांच्या मध्यस्थीने पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी ८ नोव्हेंबरपासून मणकर्णा ओढ्यात पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. या आंदोलनात संजय कोकाटे, झुंजार भांगे, चंद्रशेखर गोटे, शहाजी साठे, नितीन साठे, दिनेश जगदाळे यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सहनशक्तीचा अंत नको, पाण्यासाठी मुडदे पाडायचे आहेत का? आवर्तन सुरू होऊन ९० दिवस झाले, तरी माढ्यात एकदाही पाणी सोडण्यात आलेले नाही. इतर ठिकाणी तीन वेळा पाणी दिले जाते; मात्र माढ्याला एकदाही पाणी मिळत नाही. आमच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका. पाण्यासाठी तुम्हाला मुडदे पाडायचे आहेत का, असा संतप्त सवाल राजेंद्र चवरे यांनी केला. तसेच कलम १४४ लागू करून मणकर्णा ओढ्यात पाणी सोडण्याची मागणीही त्यांनी केली. कायदा हातात घेण्याची वेळ येऊ देऊ नका : दादासाहेब साठे नैसर्गिक जलस्रोत आटत चालले आहेत. शहराला पाणीपुरवठा करणारी येवती पाइपलाइनही वारंवार फुटत असल्याने माढ्यावर पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. पाण्याची मागणी केल्यानंतर पाटबंधारे विभागाकडून केवळ आश्वासने दिली जात आहेत. दिलेल्या मुदतीत पाणी सोडले नाही, तर आम्हाला कायदा हातात घेण्याची वेळ येईल. अशी वेळ आमच्यावर येऊ देऊ नका, असा इशारा दादासाहेब साठे यांनी दिला. आश्वासन नको, प्रत्यक्ष पाणी द्या! : अॅड. साठे पाणी सोडण्याबाबत नगरपंचायतीच्या वतीने वारंवार निवेदने देऊनही त्याची दखल घेतली जात नाही. पाणीवाटपात माढ्यावर अन्याय होत असून, पाणीवाटपाच्या वेळापत्रकात माढ्याचा समावेश नाही का, असा सवाल नगराध्यक्षा अॅड. मिनल साठे यांनी केला. पाणीवाटपाचे वेळापत्रक जाहीर करण्याची मागणी करत केवळ आश्वासने नकोत, तर प्रत्यक्ष पाणी द्या, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
Source link
मणकर्णा ओढ्याच्या पाण्यासाठी 2 तास रास्ता रोको अन् हलगीनाद:माढ्यात सर्वपक्षीय आंदोलन, 8 नोव्हेंबरपासून पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन