![]()
शहरातील एकलव्य शिक्षण संस्थेच्या बबनराव ढाकणे साहेब स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव मिळावा, त्यांच्यातील कलागुण विकसित व्हावेत आणि हस्तकलेची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने आकाशकंदील निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेचा वापर करून रंगीबेरंगी आणि आकर्षक आकाशकंदील तयार केले. प्रारंभी शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आकाशकंदील तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखवले. कागदाची निवड, त्याला योग्य आकार देणे, विविध रंगांचा वापर, सजावटीच्या साहित्याची मांडणी तसेच कंदील तयार करण्याच्या विविध पद्धती याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पनेतून आकाशकंदील तयार करण्यास सुरुवात केली. रंगीबेरंगी कागद,आकर्षक सजावटीचे साहित्य आणि विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचा सुंदर संगम या कार्यशाळेत पाहायला मिळाला. कोणी पारंपरिक पद्धतीचे कंदील तयार केले, तर कोणी वेगवेगळ्या आकारांचे आणि रंगसंगतीचे नावीन्यपूर्ण आकाशकंदील साकारले. स्वतःच्या हाताने कलाकृती तयार करताना विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साह दिसून आला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना केवळ हस्तकलेचा अनुभव मिळाला नाही तर एकाग्रता, संयम, कल्पकता आणि स्वनिर्मितीचा आनंदही अनुभवता आला. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले कंदील दिवाळीच्या आनंदात अधिक भर घालणारे ठरणार आहेत. यावेळी बालविकास केंद्राच्या मुख्याध्यापिका आशा गोला, सारिका गोरे, संदीप खेडकर, संगीता बडे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक जनार्दन बोडखे, बन्सी खेडकर यांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या आकर्षक कलाकृतींचे कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना चालना मिळते तसेच शिक्षणासोबतच व्यवहारज्ञान आणि सर्जनशीलतेचा विकास होण्यास मदत होते, अशी भावना व्यक्त केली. कार्यशाळेतून दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिवाळीच्या सणात घरासमोर आकर्षक आकाशकंदील लावण्याची परंपरा आहे. मात्र, बाजारात उपलब्ध असलेले प्लास्टिक व थर्माकोलचे कंदील पर्यावरणासाठी हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे महागडे आकाशकंदील खरेदी करण्याऐवजी कमी खर्चात कागद व पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून घरच्या घरी आकाशकंदील तयार करावेत, असा पर्यावरण संवर्धनाचा संदेश या कार्यशाळेतून देण्यात आला.
Source link
विद्यार्थ्यांनी कल्पकतेतून साकारले पर्यावरणपूरक आकाशकंदील:पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचा संदेश; कार्यशाळेला प्रतिसाद