Headlines

‘टॉयब्ररी’ ते ग्लोबल क्लासरूम; मांडवेचे शिक्षक " आयडॉल' यादीत:श्रीनिवास एल्लाराम यांच्या कामाची दखल




वर्गातील अध्यापनापासून आंतरराष्ट्रीय स्तरावरील संवादापर्यंत आणि शैक्षणिक उपक्रमांपासून वंचितांच्या मदतीपर्यंत विविध क्षेत्रांत योगदान देणारे पाथर्डी तालुक्यातील मांडवे येथील शिक्षक श्रीनिवास एल्लाराम यांचा महाराष्ट्र शासनाच्या ‘आयडॉल शिक्षक २०२६-२७’ यादीत समावेश झाला आहे. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी), पुणे यांच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या या यादीत त्यांना स्थान मिळाले आहे. त्यांच्या नावीन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांसह सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या कार्याची दखल घेण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी एल्लाराम यांनी शैक्षणिक पालकत्व, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, ‘मस्ती की पाठशाला’, शिक्षण सप्ताह आणि ई-लायब्ररी असे विविध उपक्रम राबविले. ‘टॉयब्ररी’च्या माध्यमातून विविध शाळा व अंगणवाड्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले. व्हर्च्युअल ट्रिपद्वारे दहा देशांतील विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद साधण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळवून दिली. महाराष्ट्र शासन, टाटा ट्रस्ट आणि ब्रिटिश कौन्सिलच्या ‘तेजस’ उपक्रमात टॅग कॉर्डिनेटर म्हणून त्यांनी काम केले. जिल्हा परिषदेच्या मीडिया टीमचे मॉडरेटर म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. शैक्षणिक नवोपक्रमांचे राज्यस्तरावर सादरीकरण, मायक्रोसॉफ्टचे विविध अभ्यासक्रम आणि शिक्षक प्रशिक्षण उपक्रमांत त्यांचा सहभाग राहिला आहे. शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक कार्यातही त्यांनी योगदान दिले आहे. ‘आनंदवन’ वृक्षराई निर्मितीत सहभाग, डोनेटेड सोसायटीच्या माध्यमातून बेघर, अनाथ व आदिवासींसाठी कार्य, तसेच मनोब्रह्म फाउंडेशनच्या माध्यमातून बेघर मनोरुग्णांना मदत असे उपक्रम त्यांनी राबविले. गरजू व अनाथ विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठीही एल्लाराम कार्यरत आहेत. सहा राष्ट्रीय शिक्षण संमेलने आणि तीन राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनांच्या आयोजनातही त्यांचा सहभाग राहिला आहे. शिक्षण आणि समाजकार्याची सांगड घालत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या प्रयत्नांची एससीईआरटी, पुणे यांनी जाहीर केलेल्या ‘आयडॉल शिक्षक २०२६-२७’ यादीत समावेश करून दखल घेण्यात आली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *