![]()
शहरावर तीव्र पाणीटंचाईचे संकट घोंगावत असताना त्यावरील उपाययोजनांसाठी सोमवारी बोलावण्यात आलेल्या महापालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत टँकरद्वारे पाणीपुरवठ्याच्या प्रस्तावावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी प्रस्तावित ४४ कोटी रुपयांच्या निधीतून केवळ भ्रष्टाचार होणार असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसच्या नगरसेविका निलोफर खान यांनी केला. या आरोपामुळे सभागृहातील वातावरण तापले. मात्र, अद्याप निधी मंजूर झालेला नाही, निविदा प्रक्रियाही सुरू झालेली नाही, तर भ्रष्टाचाराचे आरोप आताच कसे करताॽ, असा सवाल महापौर शारदा खेडकर यांनी उपस्थित करत विरोधकांना प्रत्युत्तर दिले. जानेवारीअखेरपर्यंत काटेपूर्णा प्रकल्पातून पाणी उपलब्ध होण्याची शक्यता असून त्यानंतरची परिस्थिती कठीण होऊ शकते, यावर सभागृहात नगरसेवकांनी आपली मते मांडली. टंचाईच्या काळात पाणीपुरवठ्याचे नियोजन आतापासूनच करण्याची गरज नगरसेवकांनी व्यक्त केली. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सदस्यांनी पाइपलाइन, टँकरची उपलब्धता, हायड्रंट आणि पर्यायी जलस्रोतांबाबत प्रशासनाला प्रश्न विचारले. स्थायी सभापती विजय अग्रवाल यांनी प्रशासकीय अडचणींमुळे टंचाई निवारणाच्या कामात विलंब होऊ नये, यासाठी आयुक्तांना आवश्यक अधिकार देण्याचा ठराव मांडला. हीच भूमिका भाजपचे नगरसेवक विनोद मापारी यांनी मांडली. नगरसेवक आशिष पवित्रकार यांनी नवीन टँकर खरेदी करण्याऐवजी महापालिकेचे उपलब्ध टँकर वापरावेत, असे सुचवले. काँग्रेसच्या निलोफर खान यांनी टँकरद्वारे पाणीपुरवठ्याच्या खर्चावर भ्रष्टाचाराचा आरोप केला असतानाच काँग्रेसचेच फजलू पहेलवान यांनी टँकर वाढवण्याची मागणी केली. टँकरमुळेच शहरातील पाणीटंचाईचा ५० टक्के ताण कमी होऊ शकतो, असे मत त्यांनी सभेत मांडले. त्यामुळे टँकरच्या प्रस्तावावर काँग्रेसच्या दोन नगरसेवकांची वेगवेगळी भूमिका समोर आली. निलोफर खान यांनी खर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, तर फजलू पहेलवान यांनी टँकर वाढवण्याची मागणी केली. बोअरवेल अधिग्रहित करा : जयंत मसने पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अजय गुजर यांनी पुढील अडीच ते तीन महिन्यांत पाइपलाइन टाकण्याचे काम होणार असल्याची माहिती दिली. भाजपचे जयंत मसने यांनी बोअरवेल अधिग्रहित करण्याची, पाणी वाया घालवणाऱ्यांवर कारवाई करण्याची, नळांना मीटर बसवण्याची मागणी केली. टँकर वाढवल्यास ताण कमी होणार : फजलू पहेलवान तीन कामांसाठी १३२ कोटी पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने शासनाकडे सुमारे १३२ कोटी ११ लाख रुपयांच्या तीन कामांचा प्रस्ताव सादर केला आहे. यात मोर्णा प्रकल्पातून पातूर ते महान येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाइपलाइन टाकणे, मोर्णा-काटेपूर्णा प्रकल्पांतर्गत अकोट येथील जलशुद्धीकरण केंद्रावर टंचाई निवारणासाठी पंपिंग मशिनरी बसविणे आणि अकोट जलशुद्धीकरण केंद्रातून अकोला शहरात हायड्रंट उभारून टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे, अशा कामांचा समावेश आहे. यातील टँकरद्वारे पाणीपुरवठ्याच्या कामासाठी ४४ कोटी ४४ लाख रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे. या कामांना प्रशासकीय मान्यता मिळविणे, निविदा प्रक्रिया राबवणे आणि पुढील कामकाजासाठी आयुक्तांना अधिकार देण्याचा प्रस्ताव मंजूर झाला. कामे सुरू होण्याआधीच रंगले राजकारण पाणीटंचाईच्या विशेष सभेत टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचा ४४ कोटी ४४ लाखांचा प्रस्ताव संघर्षाचा केंद्रबिंदू ठरला. काँग्रेसने निधीत भ्रष्टाचार होणार असल्याचा आरोप करत सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र, अद्याप शासनाची मान्यता मिळालेली नाही, निविदा प्रक्रियाही सुरू नाही, मग भ्रष्टाचाराचा आरोप आताच कसा, असा सवाल सत्ताधारी पक्षाने उपस्थित केला. आयुक्तांनीही विरोधकांच्या गैरव्यवहारांच्या आरोपांना प्रत्युत्तर देत टँकर बंद करण्याची भूमिका मांडली. विशेष म्हणजे, काँग्रेसचे फजलू पहेलवान यांनीच टँकर वाढवण्याची मागणी केल्याने विरोधकांच्या भूमिकेतील विसंगतीही सभागृहात समोर आली.
Source link
वार-पलटवार:टँकरच्या निधीत भ्रष्टाचार होणार- विरोधक, निविदेआधीच साक्षात्कार कसा?- सत्ताधारी