![]()
नोव्हेंबर महिना सुरू झाला असला तरी पैठण तालुक्यात यंदा रब्बी हंगामाची सुरुवात अत्यंत संथ झाली आहे. पावसाच्या अनियमिततेमुळे शेतजमिनीतील ओलावा गायब झाल्याने रब्बीची पेरणी अवघ्या ३ टक्क्यांवर रेंगाळली आहे. मागील वर्षी याच कालावधीत ६० टक्क्यांहून अधिक पे
.
यंदाच्या पावसाळ्यात सुरुवातीला चांगला पाऊस झाला, परंतु त्यानंतर पावसाने मोठा खंड दिला. अनेक भागांत अपेक्षित परतीचा पाऊस झालाच नाही. खरिपाची पिके निघाल्यानंतर रब्बीची वावर तयार करण्याची वेळ आली, पण जमिनीत पुरेशी ओल नसल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची घाई टाळली आहे.
तालुक्यात जायकवाडीसारखा मोठा प्रकल्प असला, तरी त्याचा फायदा सर्वच गावांना मिळत नाही. कालव्यांच्या मर्यादा, विहिरींची खालावलेली पाणीपातळी आणि स्थानिक लघू-मध्यम प्रकल्पांमधील अपुरा पाणीसाठा यामुळे कोरडवाहू शेतकरी पूर्णपणे अडचणीत सापडला आहे.
खरीप हातातून गेल्यानंतर आता रब्बी हंगामही ठप्प झाल्याने शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने बळीराजाला तात्काळ दिलासा द्यावा आणि वाढीव आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते जितू परदेशी व बजरंग लिंबोरे यांनी केली आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
नोव्हेंबर महिना सुरू झाल्याने पेरणीचा कालावधी झपाट्याने कमी होत आहे. शेतकरी सध्या परतीच्या किंवा अवकाळी पावसाच्या आशेवर डोळे लावून बसले आहेत. आगामी काळात पाऊस होऊन जमिनीत ओल निर्माण झाली, तरच पेरण्यांना काही प्रमाणात वेग येईल; अन्यथा यंदाचा संपूर्ण रब्बी हंगामच निष्फळ ठरण्याची भीती व्यक्त होत आहे.
संपूर्ण मराठवाड्यात रब्बीची स्थिती बिकट केवळ पैठणच नव्हे, तर संपूर्ण मराठवाड्यात रब्बीची स्थिती बिकट आहे. कृषी विभागाच्या १ नोव्हेंबरच्या अहवालानुसार, मराठवाड्यात सरासरीच्या तुलनेत केवळ २० टक्के पेरणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पावसाअभावी ज्वारी, हरभरा आणि करडईचे क्षेत्र प्रचंड घटण्याची भीती आहे. सध्या केवळ मुबलक सिंचन उपलब्ध असलेले शेतकरी गहू व हरभऱ्याचे धाडस करत आहेत.
पैठण तालुक्यातील पेरणीची आकडेवारी नाहीच्या बरोबर Ãतालुक्यात सध्या रब्बीची आकडेवारी केवळ २४५ हेक्टरवर अडकली आहे. ही आकडेवारी ‘नाही’च्या बरोबर असून यंदाचे चित्र अत्यंत निराशाजनक आहे. -विकास पाटील, तालुका कृषी अधिकारी, पैठण