![]()
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांना त्यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ मरणोत्तर प्रदान करण्यात यावा, यासाठी केंद्र सरकारकडे विशेष आग्रह धरला जाईल, अशी ग्वाही खासदार ज्योती वाघमारे यांनी दिली. महात्मा ज्योतिराव फुले द्विशताब्दी जयंती महोत्सव समितीच्या वतीने आयोजित अभिवादन सभेत त्या बोलत होत्या. या प्रसंगी विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे एक विशेष आकर्षण खासदार ज्योती वाघमारे यांनी सादर केलेले महात्मा फुले यांच्या कार्यावर आधारित प्रेरणादायी गीत होते. त्यांच्या सुश्राव्य आवाजातील या गीताने उपस्थितांची मने जिंकली आणि सभागृहात चैतन्य निर्माण झाले. लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी सांभाळतानाच कलेच्या माध्यमातून त्यांनी व्यक्त केलेल्या आदरांजलीचे कौतुक झाले. पुणे महानगरपालिकेचे उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी यावेळी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. पुणे ही महात्मा फुलेंची कर्मभूमी असल्याने पुढील वर्षी महात्मा फुले यांची देशातील सर्वात मोठी आणि भव्य जयंती पुणे शहरात साजरी केली जाईल, असे ते म्हणाले. यासाठी महापालिकेकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले. द्विशताब्दी महोत्सव समितीचे मुख्य निमंत्रक राहुल डंबाळे यांनी समितीच्या आगामी कार्याची रूपरेषा स्पष्ट केली. महात्मा फुले यांच्या विचारांचा वारसा जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी समितीच्या वतीने वर्षभर विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला सोलापूर येथील सामाजिक कार्यकर्ते विश्वास गायकवाड, अंजूम इनामदार, शिवसेनेचे मिलिंद आहिरे, विठ्ठल गायकवाड, अशोक दिलपाक, राहुल नागटिळक यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी महात्मा फुले यांच्या कार्याचे स्मरण करत त्यांच्या विचारांचा जागर करण्याचा निर्धार व्यक्त केला.
Source link
महात्मा फुलेंना 'भारतरत्न'साठी खासदार वाघमारे यांचा विशेष आग्रह:द्विशताब्दी जयंती वर्षात सन्मान मिळावा, केंद्र सरकारकडे करणार मागणी