![]()
नागपूर रेल्वे स्थानकावर रेल्वे संरक्षण दलाने (आरपीएफ) अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत ३४ लाख ७१ हजार रुपये किमतीचा ३४ किलो ७१० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून, दोन तस्करांना अटक करण्यात आली आहे. आरपीएफच्या गुन्हे शाखेचे पथक प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर गस्त घालत असताना, त्यांना दोन व्यक्ती मोठ्या ट्रॅव्हल बॅगांसह संशयास्पदरीत्या फिरताना दिसल्या. पोलिसांनी जवळ येताच त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र जवानांनी त्यांना रोखले. चौकशीत त्यांनी उडवाउडावीची उत्तरे दिली. स्वतंत्र पंचांच्या उपस्थितीत त्यांच्या बॅगांची तपासणी केली असता, त्यात खाकी टेपने गुंडाळलेली गांजाची पाकिटे आढळून आली. वजन काट्यावर मोजणी केली असता, एकूण ३४ किलो ७१० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ३४ लाख ७१ हजार रुपये आहे. आरोपींनी चौकशीदरम्यान हा गांजा ओडिशातून आणल्याची आणि नागपूरमार्गे इतर मोठ्या शहरांमध्ये पोहोचवण्याची त्यांची योजना असल्याची कबुली दिली. आरपीएफने जप्त केलेला मुद्देमाल आणि दोन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी नागपूरच्या शासकीय रेल्वे पोलिसांकडे (जीआरपी) सोपवले आहे. जीआरपीने आरोपींविरुद्ध अंमली पदार्थ विरोधी कायदा (एनडीपीएस) अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. हा गांजा कोणाकडून घेण्यात आला आणि कोणाला पुरवला जाणार होता, याचा शोध घेण्यासाठी जीआरपी आणि आरपीएफचे पथक संयुक्तपणे आंतरराज्यीय ड्रग रॅकेटच्या मुख्य सूत्रधाराचा तपास करत आहे.
Source link
नागपूर रेल्वे स्थानकावर आरपीएफची मोठी कारवाई:34 लाखांच्या गांजासह दोन तस्कर ताब्यात, ओडिशा कनेक्शन उघड