![]()
अहिल्यानगर शहरातून ७ प्रमुख राज्य महामार्ग आणि २ राष्ट्रीय महामार्ग जातात. हे महामार्ग शहराला इतर राज्यांशी आणि जिल्ह्यांशी जोडणारे महत्त्वाचे दुवे आहेत. मात्र, सध्या या रस्त्यांची अवस्था कुठे चांगली तर कुठे अत्यंत वाईट अशी झाली आहे. यात भर म्हणून महामार्गाच्या मधोमध असलेल्या दुभाजकांची अवस्था धोकादायक बनली आहे. अनेक ठिकाणी दुभाजक तुटलेले आहेत, तर काही ठिकाणी त्यांची उंची योग्य नाही. सर्वात गंभीर बाब म्हणजे या दुभाजकांवर पुरेशी पथदिव्यांची सोय नाही. रात्रीच्या वेळी अंधारामुळे वाहनचालकांना रस्त्यावरील वळणांचा आणि कट्सचा अंदाज येत नाही. परिणामी, वेगाने येणारी अवजड वाहने थेट या दुभाजकांना धडकतात. गेल्या काही महिन्यांत अशा अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले असून, अनेक निष्पाप वाहनचालकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, तर अनेक जण कायमचे अपंग झाले आहेत. या जीवघेण्या परिस्थितीमुळे वाहनचालक आणि स्थानिक नगरकरांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. रस्ता सुरक्षा समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या समस्येकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. संबंधित प्रशासनाने तातडीने संयुक्त मोहीम राबवून या दुभाजकांची दुरुस्ती करावी आणि तिथे पुरेशी प्रकाशव्यवस्था करावी, अशी मागणी जोर धरत आहे. प्रशासन आणखी किती बळी जाण्याची वाट पाहत आहे, असा संतप्त सवाल आता नगरकर विचारत आहेत. अधिकृत आकडेवारीनुसार, गेल्या वर्षभरात शहरातील महामार्गांवर दुभाजकांना धडकून ५० हून अधिक मोठे अपघात झाले, ज्यात ६ जणांचा मृत्यू झाला. गेल्या महिन्यात एका अवजड ट्रकने दुभाजकाला दिलेल्या धडकेत तीन तरुणांना आपले प्राण गमवावे लागले होते. यावरून परिस्थिती किती गंभीर आहे, हे स्पष्ट होते. दुरवस्थेचे ‘हॉटस्पॉट’ छत्रपती संभाजीनगर रस्ता, महापालिकेसमोरील परिसर आणि कल्याण महामार्गावर काही ठिकाणी दुभाजक पूर्णपणे फुटले आहेत. नगर-पुणे रस्त्यावरील काही कट्स अत्यंत धोकादायक बनले असून, रात्रीच्या वेळी अंधारामुळे हे कट्स मृत्यूचे सापळे ठरत आहेत.
Source link
महामार्गांवरील दुभाजक बनले मृत्यूचे सापळे:वर्षभरात 50 अपघात, 6 बळी; 7 राज्य व 2 महामार्गांवरील दुभाजकांची दुरवस्था