Headlines

महावितरणचे दुर्लक्ष:केडगाव भाजीबाजारात "डेथ ट्रॅप'; उघड्या डीपीने वाढवली धास्ती, लहान मुले, महिला अन् ज्येष्ठांच्या जीवाला धोका‎




केडगाव येथील शाहूनगर भाजीबाजार परिसरातील पाच गोडाऊनच्या कंपाऊंड वॉलला लागून असलेला महावितरणचा विद्युत वितरण रोहित्र (डीपी) सध्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी अत्यंत धोकादायक ठरत आहे. या डीपीचा दरवाजा तुटलेला असून तो गेल्या अनेक दिवसांपासून उघड्याच अवस्थेत पडून आहे. महावितरणच्या या निष्काळजीपणामुळे येथे कधीही गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शाहूनगर परिसरातील या भाजीबाजारात सकाळपासून सायंकाळपर्यंत नागरिकांची मोठी वर्दळ असते. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि पालकांसोबत येणारी लहान मुले यांची संख्या मोठी असते. गर्दीच्या वेळी उघड्या डीपीमधील फ्युज किंवा उघड्या जिवंत तारांना चुकून कुणाचा स्पर्श झाल्यास मोठी जीवितहानी होऊ शकते. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्थानिक नागरिकांनी महावितरणच्या अहिल्यानगर मंडळाच्या अधीक्षक अभियंत्यांना निवेदनाद्वारे तातडीने कारवाई करण्याची विनंती केली आहे. महावितरणने जनहित आणि सुरक्षिततेचा विचार करून या डीपीला तातडीने नवीन व मजबूत दरवाजा बसवावा, अशी आग्रही मागणी केडगाव येथील ग्रामस्थ व व्यापाऱ्यांकडून केली जात आहे. संरक्षक जाळी बसवून नियमित पाहणी करावी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ प्रत्यक्ष जागेची पाहणी करून उघड्या डीपीला नवीन व मजबूत लोखंडी दरवाजा बसवावा आणि तो कायम लॉक राहील याची व्यवस्था करावी. तसेच, सुरक्षेच्या दृष्टीने आजूबाजूला संरक्षक जाळी बसवून नियमित पाहणी (तपासणी) केल्यास ही समस्या कायमस्वरूपी सुटू शकते. नवीन मजबूत दरवाजा बसवून डीपी सुरक्षित करावी ^ शाहूनगर-केडगाव भाजीबाजार परिसरातील उघडे विद्युत रोहित्र (डीपी) नागरिकांच्या जीवितासाठी गंभीर धोका आहे. येथे दररोज लहान मुलांची व महिलांची मोठी वर्दळ असते. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी महावितरणने नवीन मजबूत दरवाजा बसवून डीपी सुरक्षित करावी -संतोष चंद्रकांत यादव, स्थानिक नागरिक, केडगाव.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *