Headlines

महावितरणच्या गलथान कारभाराविरोधात रस्ता रोको:बार्शी- तुळजापूर मार्गावरील मळेगावात बैलपोळ्याच्या दिवशीच आंदोलन; 2 तास वाहतूक ठप्प‎



महावितरणच्या गलथान कारभाराला कंटाळून मळेगाव व परिसरातील शेतकऱ्यांनी बैलपोळा सणाच्या दिवशीच छत्रपती शिवाजी महाराज चौकात बार्शी-तुळजापूर राज्यमार्गावर जोरदार रस्ता रोको आंदोलन केले.

.

गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारली असून दिवसा सूर्य आग ओकत आहे. अशा परिस्थितीत महावितरणच्या वतीने शेतकऱ्यांवर लादलेले रात्रीचे इमर्जन्सी लोडशेडिंग, कमी दाबाने मिळणारी वीज, जळालेले ट्रान्सफॉर्मर बदलून मिळणे आणि महावितरणच्या कारभारातील त्रुटींमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला.

जळालेले ट्रान्सफॉर्मर शेतकऱ्यांना स्वतः पैसे खर्च करून आणावे लागत आहेत. ट्रान्सफॉर्मरचे फ्युज वायर व इतर खर्चही शेतकऱ्यांवरच लादला जातो. वीज खंडित झाल्यानंतर महावितरणकडून डीओ फ्युज वेळेत दुरुस्त करून वीजपुरवठा सुरळीत केला जात नाही. तो विनामोबदला लवकरात लवकर सुरू करून मिळावा, रोहित्र दुरुस्तीचा खर्च शेतकऱ्यांकडून घेतला जाऊ नये आणि नियमानुसार ४८ ते ७२ तासांत डीपी मिळावी, या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी बाळासाहेब माळी, राजाभाऊ शेळके, निवृत्ती गडसिंग, सरपंच समाधान पाडूळे, अविनाश मोरे, अशोक माळी, चंद्रकांत मुंबरे यांनी आंदोलनाला संबोधित करत शेतकऱ्यांच्या मनातील खदखद व व व्यथा मांडल्या. अखेर संबंधित अधिकारी डोंगरे यांनी मागण्यांचे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले. या आंदोलनात पंचक्रोशीतील शेतकरी सहभागी झाले होते.

लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित या रस्ता रोको आंदोलनामुळे बार्शी-तुळजापूर मार्ग तब्बल दोन तास रोखून धरण्यात आला होता. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या आंदोलनाला वाहनधारक, प्रवासी व स्थानिक शेतकऱ्यांनी मोठा पाठिंबा दर्शवला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *