![]()
महावितरणच्या ‘नाट्यबहार’ आंतरप्रादेशिक राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेत नागपूर परिमंडलाच्या ‘थलाई कुथल’ या नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला, तर कोल्हापूर परिमंडलाच्या ‘समोरच्या घरात’ या नाटकाला द्वितीय क्रमांक मिळाला. पुण्यातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात दोन दिवसीय झालेल्या या स्पर्धेत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी विविध सामाजिक विषयांवर आधारित नाटकांतून अभिनयकौशल्याचे दर्शन घडविले. स्पर्धेच्या समारोपप्रसंगी महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार, कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे, कार्यकारी संचालक परेश भागवत, अंकुर कावळे, पुणे प्रादेशिक संचालक सुनील काकडे यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते. परीक्षक म्हणून राज काझी, अजय धनवे, शुभांगी पाठक आणि राज कुबेर यांनी काम पाहिले. “दैनंदिन कामांची जबाबदारी सांभाळतानाही वीज कर्मचाऱ्यांनी आपल्यातील कलाकार आणि कला जिवंत ठेवली आहे. महावितरणचे कलाकार व्यावसायिक नाटकांना साजेशी कामगिरी करत आहेत,” असे राजेंद्र पवार यांनी सांगितले. दिलीप जगदाळे यांनी चारही नाटकांचे कौतुक करत स्पर्धेच्या माध्यमातून रसिकांना नाट्यरूपी मेजवानी मिळाल्याचे नमूद केले. नाट्यनिर्मितीबरोबरच दिग्दर्शनाच्या विभागातही ‘थलाई कुथल’ने प्रथम क्रमांक मिळविला. प्रफुल्ल लांडे यांना उत्कृष्ट दिग्दर्शनाचा पहिला पुरस्कार मिळाला. ‘समोरच्या घरात’साठी अमित बोकील यांना द्वितीय क्रमांक मिळाला. नेपथ्य विभागात ‘समोरच्या घरात’साठी विठ्ठल पाटील, तर प्रकाशयोजना, पार्श्वसंगीत, रंगभूषा आणि वेशभूषा या विभागांत ‘थलाई कुथल’ने बाजी मारली. उत्कृष्ट अभिनेत्याचा प्रथम पुरस्कार ‘समोरच्या घरात’मधील श्रीरंग विजयकर यांची भूमिका साकारणाऱ्या जयतीर्थ सांगलीकर यांना, तर उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार अनुराधाची भूमिका करणाऱ्या श्वेता सांगलीकर यांना मिळाला. स्पर्धेत ‘ओल्या भिंती’, ‘समोरच्या घरात’, ‘वारी’ आणि ‘थलाई कुथल’ या चार नाटकांचे सादरीकरण झाले. पुणे परिमंडलाने स्पर्धेचे आयोजन केले.
Source link
महावितरण नाट्यस्पर्धेत नागपूरच्या ‘थलाई कुथल’ला प्रथम क्रमांक:कोल्हापूरच्या ‘समोरच्या घरात’ नाटकाला दुसरा नंबर; कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना दाद