![]()
महिला आणि मुलींना कायद्याचे पूर्ण संरक्षण लाभलेले आहे. गरज आहे ती फक्त अन्यायाविरुद्ध पुढे येण्याचे धाडस दाखवण्याची, असे प्रतिपादन फुलंब्रीच्या दिवाणी न्यायाधीश आर. एस. कुलकर्णी यांनी केले. येथील न्यू ओएसिस इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये तालुका विधी सेवा समितीच्या वतीने विद्यार्थी सुरक्षा व पोक्सो कायदा या विषयावर विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. या शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये कायद्याविषयी मोठी जनजागृती झाली. न्यायाधीश कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना कायद्याचे महत्त्व सोप्या शब्दांत पटवून दिले. त्या म्हणाल्या, आपल्या आसपास किंवा वैयक्तिक जीवनात लैंगिक अत्याचाराचे प्रसंग उद्भवल्यास ती घटना भीतीपोटी कधीही लपवू नका. घटना लपवल्याने गुन्हेगाराची हिंमत वाढते. अशा वेळी अजिबात न घाबरता तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा. पोलीस आपले मित्र आहेत, हे लक्षात ठेवावे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून डीवायएसपी पूजा नागरे, सहायक पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच फुलंब्री तालुका वकील संघाचे आजिनाथ कापरे, आर. एस. काझी, अमोल ढेपले, संतोष पाथ्रीकर, शैलेश आरक, के. गायकवाड, संगीता हिवराळे, जावेद, शहाबाज, राम गायकवाड, समीर, निसार सय्यद एस. एस. गायकवाड यांची उपस्थिती होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका करुणा दांडगे, उपप्राचार्य विल्सन डेव्हिड, प्रिया पैठणे, स्वाती खोजे, इंदू जाधव, सपना सोनवणे यांच्यासह सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
Source link
महिलांनी अन्यायाविरुद्ध पुढे येण्याचे धाडस दाखवण्याची गरज- कुलकर्णी:फुलंब्रीत विद्यार्थी सुरक्षा अन् ‘पोक्सो’ कायद्याबाबत जनजागृती शिबिर उत्साहात