![]()
छत्रपती संभाजीनगरमधून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली असून, एमआयएमचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यांच्या कार्यालयात एक धमकीचे पत्र आढळून आले असून, यात त्यांना कोणत्याही क्षणी जीवे मारले जाऊ शकते, असा गंभीर इशारा देण्यात आला आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इम्तियाज जलील यांना जीवे मारण्याची सुपारी अहिल्यानगर येथील एका तरुणाला देण्यात आल्याचा खळबळजनक दावा या पत्रात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या पत्रात संबंधित तरुणाचे नाव आणि त्याचा पत्ताही नमूद करण्यात आला आहे. ‘तुम्हाला कोणत्याही क्षणी जीवे मारले जाईल,’ असा मजकूर या पत्रात लिहिला असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या पत्रातील दाव्यांची सत्यता अद्याप स्पष्ट झालेली नाही. हे धमकीचे पत्र मिळताच इम्तियाज जलील यांनी ते पोलिसांकडे सुपूर्द केले असून, पत्रातील दाव्यांची आणि त्यात उल्लेख असलेल्या अहिल्यानगरमधील व्यक्तीची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्यानुसार पोलीस आता या पत्रामागील नेमका सूत्रधार कोण, पत्रातील माहिती किती खरी आहे आणि संबंधित तरुणाचा याच्याशी काही संबंध आहे का, याचा कसून तपास करत आहेत. इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया धमकीच्या पत्रावर प्रतिक्रिया देताना इम्तियाज जलील म्हणाले की, राजकारणात आल्यानंतर अनेकवेळा असे प्रसंग येतात की कोणीतरी तुम्हाला फोन करून धमकी देतं, कधी लेटर पाठवतात. कधी कोणाकडून तरी माहिती मिळते की तुमच्या जीवाला धोका आहे, जीवे मारण्याची धमकी आहे. तर ही एक प्रोसेस आहे, या गोष्टी चालूच असतात. पुढे बोलताना इम्तियाज जलील म्हणाले, त्यांचा उद्देश्य हाच असतो की कसेही करून यांना भीती दाखवा, म्हणजे हे शांत बसतील, सरकारच्या विरोधात बोलणार नाही, नेत्यांच्या विरोधात बोलणार नाही, असे असले तरी आम्ही आमचे काम सुरूच ठेवतो, जे काही चुकीचे सुरू आहे, त्याच्याविरोधात आवाज उठवतच राहणार, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
Source link
माजी खासदार इम्तियाज जलील यांना जीवे मारण्याची धमकी!:कार्यालयात आले धमकीचे पत्र, अहिल्यानगरच्या तरुणाला सुपारी दिल्याचा पत्रात दावा