Headlines

माझा लढा सत्तेसाठी नव्हे, तर शेतकऱ्यांसाठी- गडाख:सोनईत हजारो शेतकऱ्यांची उपस्थिती, चांगल्या चाललेल्या संस्थेत विरोधकांनी राजकारण आणू नये‎




माजी खासदार यशवंतराव गडाख यांनी उभी केलेली आणि शेतकऱ्यांची कामधेनू ठरलेली मुळा संस्था आम्ही सर्वांच्या साथीने समर्थपणे चालवत आहोत. गेल्या ५ वर्षांपासून सहकारी साखर कारखानदारी अनेक अडचणींना सामोरी जात असतानाही, मोठ्या कष्टाने व काटकसरीने मुळा कारखाना सुस्थितीत सुरू आहे. माझा लढा सत्तेसाठी नसून केवळ शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी केले. सोनई येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते. या मेळाव्याला तालुक्यातील विविध गावांमधील हजारो शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, तरुण आणि गडाख समर्थक कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली होती. याप्रसंगी उपस्थित जनसमुदायाने माजी मंत्री गडाख यांचा वाढदिवसानिमित्त जाहीर सन्मान करत त्यांना शुभेच्छा दिल्या. शंकरराव गडाख म्हणाले, मुळा कारखान्याच्या माध्यमातून गावोगावी शेतकऱ्यांना ऊस बेणे, खते, पाइपलाइनसाठी अॅडव्हान्स, बंधारे निर्मिती, ट्रॅक्टर आणि ऊस हार्वेस्टिंग मशीन खरेदीसाठी मोठी मदत करण्यात आली. यामुळेच तालुक्याच्या अर्थकारणाला गती मिळाली आहे. सभासदांच्या उसाचे वेळेत गाळप व्हावे यासाठी कारखान्याचे विस्तारीकरण (एक्सपान्शन) करण्यात आले आहे. सभासदांच्या विश्वासाच्या बळावर आगामी निवडणूक यशस्वीपणे पार पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मेळाव्याचे प्रास्ताविक ‘मुळा’चे चेअरमन नानासाहेब तुवर यांनी केले. ते म्हणाले, यशवंतराव गडाख व शंकरराव गडाख यांनी माझ्यासारख्या एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील व्यक्तीवर सलग ११ वर्षे विश्वास दाखवून चेअरमन म्हणून काम करण्याची संधी दिली. ‘मुळा’ने नेहमी सामान्य शेतकरी केंद्रबिंदू मानून काम केले आहे. केवळ विरोधाला विरोध म्हणून काहींनी संस्थेत राजकारण आणू नये.तुवर यांनी आगामी कारखाना निवडणूक न लढवण्याची घोषणा केली. या मेळाव्यात अॅड. सुभाष दरंदले, अश्रूबा सानप, योगेश होंडे, बाळासाहेब पाटील यांनीही मनोगत व्यक्त करत गडाख यांच्या नेतृत्वाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले. या सोहळ्याला रामनाथ महाराज पवार, अवेराज महाराज, विश्वासराव गडाख, जि.प.चे माजी सभापती सुनीलराव गडाख, युवा नेते उदयन गडाख, बाजार समितीचे सभापती नंदकुमार पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती रावसाहेब कांगुणे, व्हा. चेअरमन कडूबाळ कर्डिले, दत्तात्रय काळे, तुकाराम शेंडे, बाजीराव मुंगसे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. रामनाथ बडे यांनी केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *