Headlines

मार्केटयार्डमध्ये 25 लाखांचे मेफेड्रॉन जप्त:पुण्यात तरुणाला अटक, घरातून भावाच्या मदतीने करत होता विक्री




पुणे, प्रतिनिधी: मार्केटयार्ड पोलिसांनी अमली पदार्थ विक्री करणाऱ्या एका तरुणाच्या घरावर छापा टाकून 25 लाख 18 हजार 880 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये 125 ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी), देशी-विदेशी दारू, शस्त्रे आणि रोख रक्कम यांचा समावेश आहे. या प्रकरणी ओम कुंडलिक गायकवाड (वय 25, रा. आनंदनगर वसाहत, मार्केट यार्ड, पुणे) याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गायकवाड हा आनंदनगर वसाहतीतील सार्वजनिक शौचालयाजवळील गल्लीतील घरातून आपल्या भावाच्या मदतीने अमली पदार्थांची विक्री करत असल्याची माहिती पोलिस अंमलदार महिबूब नदाफ यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत तब्बल 25 लाख रुपये किमतीचे 125 ग्रॅम मेफेड्रॉन, 10 हजार 400 रुपयांची रोकड, देशी-विदेशी दारूच्या बाटल्या, एक तलवार, कुऱ्हाड, लोखंडी पाइप आणि इलेक्ट्रॉनिक वजनकाटा जप्त करण्यात आला. आरोपी ओम गायकवाड आणि त्याच्या भावाविरुद्ध मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायदा, महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, शस्त्र अधिनियम, भारतीय न्याय संहिता आणि महाराष्ट्र पोलिस अधिनियमातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीच्या भावाचा शोध सध्या सुरू आहे. मेफेड्रॉनचा साठा नेमका कोठून आणला होता आणि त्याची विक्री कोणाला केली जात होती, याचा पुढील तपास मार्केट यार्ड पोलिस करत आहेत. अपर पोलिस आयुक्त राजेश बनसोडे, पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते आणि सहायक पोलिस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजीत जगताप यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलिस निरीक्षक सुनीता नवले, उपनिरीक्षक अक्षयकुमार गजाडे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *