![]()
माजी लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे (निवृत्त) यांनी माहिती युद्धाच्या सध्याच्या आव्हानात्मक काळात पत्रकार आणि प्रसारमाध्यमांची भूमिका राष्ट्रीय सुरक्षेइतकीच महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन केले. पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित ‘ज. स. करंदीकर स्मृती व्याख्यान’ कार्यक्रमात ‘राष्ट्रीय सुरक्षा व माध्यमांची भूमिका’ या विषयावर ते बोलत होते. देशाची लोकशाही मजबूत ठेवण्यासाठी सुरक्षित राष्ट्र जितके आवश्यक आहे, तितकीच मुक्त, जबाबदार आणि सजग प्रसारमाध्यमेही आवश्यक आहेत, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील, सरचिटणीस मंगेश फल्ले, पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष शैलेश काळे आणि कार्यवाह पांडुरंग सांडभोर आदी मान्यवर उपस्थित होते. सध्याच्या जागतिक परिस्थितीवर भाष्य करताना जनरल पांडे म्हणाले की, युद्धाचे स्वरूप आता पूर्णपणे बदलले आहे. आजचे युद्ध केवळ सीमेपुरते मर्यादित राहिलेले नाही. पारंपरिक युद्धासोबतच आता ‘हायब्रीड वॉरफेअर’, ‘नॉन-कॉन्टॅक्ट वॉरफेअर’ आणि माहितीच्या आघाडीवरील युद्ध (इन्फॉर्मेशन वॉर) अधिक प्रभावी झाले आहे. समाजामध्ये अविश्वास, भीती आणि तणाव निर्माण करण्यासाठी चुकीची माहिती, डीपफेक व्हिडीओ, फेरफार केलेली छायाचित्रे आणि सोशल मीडियावरील दिशाभूल करणाऱ्या पोस्टचा वापर केला जात आहे. आज लष्करी मोहिमांच्या केंद्रस्थानी ‘इन्फॉर्मेशन ऑपरेशन्स’ आले असून, एखादी छोटीशी चुकीची माहिती किंवा बातमीही राष्ट्रीय सुरक्षेला गंभीर धोका निर्माण करू शकते. माहितीची पोकळी निर्माण झाली की ती तात्काळ अफवांनी भरली जाते, असा इशारा त्यांनी दिला. राष्ट्रीय सुरक्षा आणि पत्रकारिता हे दोन वेगळे विषय वाटत असले तरी प्रत्यक्षात ते एकमेकांशी अत्यंत घट्ट जोडलेले आहेत. लष्कर आणि माध्यमांनी एकमेकांकडे संशयाने न पाहता राष्ट्रीय सुरक्षेसाठी परस्पर विश्वास, समन्वय आणि जबाबदारीच्या भावनेतून पाहिले पाहिजे, असे जनरल पांडे यांनी स्पष्ट केले. लष्करी कारवायांचे किंवा संवेदनशील घटनांचे वार्तांकन करताना पत्रकारांनी विशेष काळजी घेण्याची गरज अधोरेखित करत त्यांनी ‘५ आर’ सूत्र मांडले. यात जबाबदारी (कोणतीही माहिती किंवा वृत्त देताना त्याचे सामाजिक व राष्ट्रीय परिणाम लक्षात घेणे), संयम (संवेदनशील घटनांमध्ये सनसनाटीपणा टाळणे), सत्यता पडताळणी (माहितीची पूर्ण खातरजमा करूनच ती प्रसारित करणे), लवचिकता (बदलत्या कठीण परिस्थितीतही शांतपणे आणि सक्षमपणे आपले कर्तव्य बजावणे) आणि प्रजासत्ताक मूल्ये (लोकशाही, संविधान आणि राष्ट्रीय हित सदैव जपणे) यांचा समावेश आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने तनिष्का डोंगरे यांनी केले.
Source link
माहिती युद्धात माध्यमांची भूमिका राष्ट्रीय सुरक्षेइतकीच महत्त्वाची:माजी लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांचे प्रतिपादन