Headlines

पंतप्रधान मोदींना 'महागाई रत्न' पुरस्कार:महागाई वाढवल्याचा आरोप करत पुणे महिला काँग्रेसने केली पुरस्काराची घोषणा




पुणे शहर महिला काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘महागाई रत्न’ पुरस्कार जाहीर केला आहे. केंद्रातील भाजप सरकारने गेल्या १२ वर्षांत महागाईचा कळस गाठल्याचा आरोप करत, या सरकारचे नेतृत्व करणाऱ्या पंतप्रधानांना हा पुरस्कार देण्याची घोषणा पुणे शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा स्वाती शिंदे यांनी केली.

महिला काँग्रेसने पंतप्रधान मोदी यांना पुरस्कार स्वीकारण्यासाठी पुण्यात येण्याची विनंती करणारे पत्र पाठवले आहे. पंतप्रधान हा पुरस्कार स्वीकारतील, अशी खात्री या पत्रात व्यक्त करण्यात आली आहे. पंतप्रधान पुरस्कार स्वीकारण्यासाठी येतील तेव्हा हजारो महिला ‘अस्से कमळ नको ग बाई’ हे समूहगीत सादर करतील, असेही पत्रात नमूद केले आहे.

देशात घरगुती व व्यापारी गॅस, पेट्रोल, डिझेल, सीएनजी, धान्य, खते, दूध, अंडी, भाजीपाला आणि प्रवास अशा सर्वच स्तरांवरील महागाईमुळे जनता होरपळून निघत आहे. पंतप्रधानांना पाठवलेल्या पत्रात, ही त्यांच्या १२ वर्षांच्या दिशाहीन कारभाराची फळे असल्याचे म्हटले आहे.

मोदी सरकारची आर्थिक धोरणे चुकीची ठरली असून त्याचे दुष्परिणाम सामान्य भारतीयांना भोगावे लागत आहेत, असे स्वाती शिंदे यांनी स्पष्ट केले. लोकांच्या भावना आणि संताप व्यक्त करण्यासाठीच ‘महागाई रत्न’ पुरस्काराची घोषणा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *