![]()
हायकोर्टाच्या दणक्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे गुरुवारी अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) अधिकारी या न्यायालयाच्या आवारातील बॉम्बे बार असोसिएशनच्या (बीबीए) वकिलांच्या कॅन्टीनच्या पाहणीसाठी पोहोचले होते. पाहणीपूर्वीच कॅन्टीनने आपली सेवा तात्पुरती बंद केली होती. हा निर्णय आम्ही स्वयंस्फूर्तीने घेतल्याचा दावा असोसिएशनने केला आहे. बॉम्बे बार असोसिएशनचे सचिव नौशाद इंजिनियर यांनी एका निवेदनात सांगितले की, कॅन्टीन बंद करण्याचे पाऊल असोसिएशनने स्वतःहून उचलले आहे. ३० जुलै रोजी एफडीएकडून कोणताही प्रतिकूल आदेश किंवा नोटीस आम्हाला प्राप्त झालेली नाही, असेही त्यांनी सांगितले. दक्षिण मुंबईतील या कॅन्टीनची सेवा लवकरच पुन्हा सुरू होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. बुधवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने एफडीएला सर्व सरकारी आणि निमसरकारी कॅन्टीनची तपासणी करण्याचे निर्देश दिले होते. यात मंत्रालय आणि उच्च न्यायालयाच्या कॅन्टीनचाही समावेश असून, व्हिडिओ रेकॉर्डिंगसह अहवाल सादर करण्यास सांगितले होते. आता ३१ जुलै रोजी होणाऱ्या सुनावणीत एफडीएला राज्यभरात केलेल्या कारवाईचा तपशील सादर करावा लागेल. रॅडिसन हॉटेलला कोर्टाचा दिलासा : नवी मुंबईतील एका ४ तारांकित हॉटेलचा (पार्क इन बाय रॅडिसन) परवाना निलंबित करण्याचा एफडीएचा निर्णय उच्च न्यायालयाने रद्द करत त्यांना मोठा दिलासा दिला आहे. हॉटेलने स्वच्छतेचे ९५ टक्के निकष पूर्ण केले असताना केवळ २ झुरळ आढळल्याच्या कारणावरून ३ जुलै रोजी त्यांचा परवाना निलंबित केला होता. संभाजीनगरच्या एफडीए प्रयोगशाळेतकर्मचाऱ्यांचा २ शिफ्ट करण्यास विरोध छत्रपती संभाजीनगर | राज्याच्या अन्न व औषध प्रशासन प्रयोगशाळांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर लादलेल्या दोन शिफ्टच्या कार्यपद्धतीला तीव्र विरोध दर्शवला आहे. अपुरे मनुष्यबळ असतानाही कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण दिला जात असून, शासनाने पूर्ववत कार्यालयीन वेळ लागू करावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी निवेदनाद्वारे मंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडे केली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील प्रयोगशाळेत जवळपास १८ पदे रिक्त आहेत. सध्या अन्न विभागात ६ कायमस्वरूपी तर २ कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहे. त्यामुळे अन्न विभागाच्या प्रयोगशाळेत ताण वाढला आहे. त्यामुळे रिक्त पदे भरण्याचीही मागणी केली आहे.
Source link
मुंबई हायकोर्टातील कॅन्टीन तपासणीपूर्वीच बंद:एफडीएचे पथक पोहोचले, आम्हीच बंदचा निर्णय घेतला- बॉम्बे बार असोसिएशन