![]()
प्रतिनिधी | राहुरी मुळा धरणाच्या जलाशयातून तीन गावांना जोडणारी बारागांव नांदूर धक्का ते जांभळी धक्का दरम्यान चालणारी प्रवासी यांत्रिक बोट नादुरुस्त झाली आहे. यामुळे गेल्या चार दिवसांपासून धरणाच्या पलीकडील वावरथ, जांभळी आणि जांभुळबन या तीन गावांमधील ग्रामस्थांचा राहुरी तालुक्याशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटला आहे. मागील चार दिवसांपूर्वी या यांत्रिक बोटीचा गिअर बॉक्स तुटल्याने ही सेवा ठप्प झाली असून, प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे ग्रामस्थांना जलकोंडीचा सामना करावा लागत आहे. राहुरी तालुक्यातील वावरथ, जांभळी आणि जांभुळबन ही तीन गावे मुळा धरणाच्या पाण्याने तीन बाजूंनी वेढलेली आहेत. येथील नागरिकांना धरणाच्या अथांग पाण्यातून प्रवासी बोटीने प्रवास करूनच बारागांव नांदूर मार्गे तालुक्याच्या ठिकाणी यावे लागते. जांभळीवरून यांत्रिक बोटीने प्रवास केल्यास राहुरी अवघ्या १६ किलोमीटर अंतरावर आहे. आता बोट बंद असल्याने रस्ता मार्गे यायचे असल्यास ढवळपुरी-अहिल्यानगर मार्गे तब्बल १०० किलोमीटर, किंवा वनकुटे, चास, आग्रेवाडी मार्गे ८० किलोमीटरचा द्राविडी प्राणायाम करावा लागत आहे. यामुळे वेळ आणि प्रवास खर्च तिप्पट वाढला आहे. या बोटीतून दररोज ३०० ते ४०० नागरिक प्रवास करत होते. मात्र, आता ज्यांना राहुरीला जाणे अत्यंत गरजेचे आहे, असे अवघे ३० ते ४० नागरिक मासेमारी करणाऱ्या खासगी छोट्या होडीतून जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. अथांग पाण्यात लहान होडी उलटल्यास जबाबदार कोण? असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी तत्कालीन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे पाठपुरावा करून जिल्हा नियोजनातून ९० लाख रुपयांच्या निधीला मंजुरी आणली होती. ‘महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड’च्या मापदंडानुसार बोटीचा आराखडा तयार करून ठेकेदाराला ६ महिन्यांची मुदत दिली होती. मात्र, राज्यात सरकार बदलले आणि संबंधित ठेकेदाराला वारंवार मुदतवाढ दिली गेली. ती नवीन बोट आजतागायत मुळा धरणात पोहोचू शकलेली नाही. वावरथ, जांभळी, जांभुळबन गावांना शासकीय कामे, आजारपण, बँक, शिक्षण आणि शेतमाल वाहतुकीसाठी याच बोटीवर अवलंबून राहावे लागते. सध्याची बोट अत्यंत जुनी आणि कालबाह्य झाली आहे. तिची तातडीने दुरुस्ती व्हावी आणि नवीन बोट मिळावी, अशी मागणी महिला संघर्ष समिती अध्यक्ष वर्षा बाचकर यांनी केली. जुनी बोट आता चालवण्यालायक नाही ^ माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या पाठपुराव्यातून नवीन बोटीसाठी जिल्हा परिषदेतर्फे ९० लाखांचा निधी मंजूर झाला होता. परंतु, दुर्दैवाने मागील ५ वर्षांत या नवीन बोटीचे अवघे ६० टक्केच काम झाले आहे. जुनी बोट आता चालवण्यालायक राहिलेली नाही. पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आता या गंभीर विषयात स्वतः लक्ष घालून नवीन यांत्रिक बोट उपलब्ध करून द्यावी. -रामदास बाचकर, उपसभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, राहुरी.
Source link
मुळा धरणातील बोट नादुरुस्त, तीन गावांचा राहुरीशी संपर्क तुटला:९० लाख रुपयांचा निधी मंजूर होऊनही ५ वर्षांत बोट मिळेना