Headlines

मोहोळच्या मुख्य रस्त्यावर अनधिकृत हातगाड्यांचा राजथाट:मोहोळ शहरातील भर रस्त्यावरील अडथळ्यामुळे भीषण अपघाताची भीती




मोहोळ शहरासह तालुक्यातून विविध ठिकाणांवरून आलेले अनधिकृत फळविक्रेते आणि पालेभाजी विक्रेते भर रस्त्यावरच हातगाड्या लावून राजथाटात विक्री करत आहेत. यामुळे मुख्य रस्त्याला पूर्णपणे मंडईचे स्वरूप आले आहे. या गंभीर अडथळ्यावर पोलिस प्रशासन आणि नगरपरिषद प्रशासन पूर्णपणे डोळेझाक करत आहे. वारंवार मागणी होऊनही केवळ एक दिवसापुरती तात्पुरती कारवाई करण्याचे ढोंग केले जाते. या ढोंगामागे पोलिस प्रशासनाचे हात गुंतलेत की नगरपरिषदेचे, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे. मोहोळ शहर हे तालुक्यातील जनतेच्या अनेक शासकीय कामांसह विविध कामांसाठी अत्यंत वर्दळीचे केंद्र आहे. मात्र, शहराच्या मेन रोडवरच फळ विक्रेते आणि पालेभाज्या विक्रेते मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण करत आहेत. रस्त्यावरून गाडी चालवताना आणि चालताना इतकी कोंडी होते की एकमेकांचे हात एकमेकांना लागत आहेत. येथे कधीही एखादा मोठा अनुचित प्रकार किंवा भीषण अपघात घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे एखादा अनुचित प्रकार घडण्याअगोदर प्रशासनाचे हात सुटावेत आणि यावर कायमस्वरूपी तोडगा निघावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी अनेकदा या समस्येबाबत प्रशासनाकडे दाद मागण्यात आली आहे. मात्र, प्रत्येक वेळी पोलीस प्रशासन ट्रॅफिक हवालदारच्या माध्यमातून, तर मोहोळ नगरपरिषद आपल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून फळ व भाजी विक्रेत्यांना हटवण्याचे केवळ तात्पुरते नाटक करते. दुसऱ्याच दिवशी परिस्थिती ‘जसे होते तसे’ होते. या प्रशासकीय ढिसाळपणामुळे आता वाहतूकदारांसह सामान्य जनतेतून तीव्र इशारा देण्यात आला. हा मेन रोड आहे की मंडई, ओळखणे मुश्किल झाले ^छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मेन रोडवरून जात असताना हा नेमका मेन रोड आहे की भाजी मंडई, हे ओळखणे मुश्किल झाले आहे. या ठिकाणावरून गाडी चालवत असताना गर्दीमुळे एकमेकांचे हात एकमेकाला लागण्याची वेळ येत आहे. येथे कोणताही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने त्वरित कायदेशीर अंमलबजावणी करावी. बंधुलाल शेख सय्यद, नागरिक, वरवडे मंडईमध्ये व्यवस्था, पाहणी करून कारवाई करणार ^संबंधित विक्रेत्यांना तिथे न बसण्याबाबत वारंवार सांगितले आहे. त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची देखील नेमणूक केली आहे. या रस्त्यावर बसणाऱ्या फळविक्रेत्यांसह पालेभाज्या विक्रेत्यांची बसण्याची अधिकृत व्यवस्था मंडई येथे करण्यात आली आहे. आम्ही पुन्हा एकदा सदर ठिकाणी पाहणी करून कडक कारवाई करू. प्रियंका गोरे, नगरपरिषद, मोहोळ



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *