Headlines

संगमनेरला अखेर नवी एमआयडीसी मंजूर; लवकरच निघेल नोटिफिकेशन:आ.खताळ यांची घोषणा, 600 तरुणांच्या मुलाखती; 125 जणांची निवड‎




संगमनेर तालुक्यातील तरुण-तरुणींच्या हाताला काम आणि हक्काचा रोजगार मिळवून देण्यासाठी आपण संगमनेरला नवीन एमआयडीसी सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला मोठे यश आले आहे. संगमनेरच्या एमआयडीसीला मंजुरी मिळाली आहे. लवकरच याबाबतचे अधिकृत नोटिफिकेशन निघणार आहे. तालुक्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी महायुती व युवासेना कटिबद्ध आहे, अशी घोषणा आमदार अमोल खताळ यांनी केली. शहरातील मालपाणी लॉन्स येथे युवासेनेच्या वतीने भव्य ‘रोजगार मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात तरुणांना मार्गदर्शन करताना आमदार खताळ बोलत होते. या रोजगार मेळाव्याला तरुण-तरुणींचा प्रचंड प्रतिसाद लाभला. मेळाव्यासाठी तब्बल १ हजार ८०० युवकांनी नोंदणी केली होती, ज्यापैकी अनेकांनी ऑनलाइन अर्ज सादर केले होते. प्रत्यक्ष मेळाव्यात ६०० तरुण-तरुणींनी मुलाखती दिल्या. यातील १२५ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली, तर काही पात्र तरुणांना जागेवरच कंपन्यांच्या वतीने ‘ऑफर लेटर’ सुपूर्द करण्यात आले. आमदार खताळ म्हणाले, सहकारी औद्योगिक वसाहतीच्या माध्यमातून इच्छुक तरुणांना उद्योग क्षेत्रात उतरता यावे, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्याधारित रोजगाराला प्रोत्साहन दिले जात असून, आयटीआय झालेल्या विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होत आहे. या प्रसंगी युवासेनेचे जिल्हाप्रमुख शुभम वाघ, भाजप राज्य कार्यकारिणी सदस्य दादाभाऊ गुंजाळ, शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजेंद्र सोनवणे, उपजिल्हाप्रमुख रमेश काळे, मंजाबापू साळवे, शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी, नगरसेविका साक्षी सूर्यवंशी, महिला उपजिल्हा प्रमुख दिपाली वावळ, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष रोहित चौधरी, युवासेना उपजिल्हा प्रमुख सौरभ देशमुख, तालुकाप्रमुख सुशील शेवाळे, शहरप्रमुख सार्थक शेवाळे, डॉ. अमोल कर्पे आदी उपस्थित होते. तरुणांनी नोकरदार नव्हे, उद्योजक बनावे ग्रामीण भागातील तरुणांना संधी मिळावी म्हणून पारेगाव येथे नव्याने सुरू झालेल्या उद्योगात सुमारे ६०० युवकांना रोजगार देण्याचा प्रयत्न केला आहे. बीएससी, एमएससी, बीसीए, आयटीआय उमेदवारांसाठी विविध संधी उपलब्ध आहेत. नोकरीच्या मागे न धावता, काही तरुणांनी स्वतःचे उद्योग सुरू करून इतरांना रोजगार देणारे उद्योजक बनावे, असे आ. खताळ म्हणाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *