.

स्वर्गीय सातलिंगप्पा म्हेत्रे यांचा चबुतरा बेकायदेशीरपणे पाडून त्या ठिकाणी गणेश मूर्तीची स्थापना केल्याच्या निषेधार्थ म्हेत्रे समर्थकांनी दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर तीव्र आंदोलन केले. बुधवारी दुपारी १२:२० वाजता सुरू झालेले हे आंदोलन तब्बल ६ तास चालले. प्रशासनाने येत्या ७ दिवसांत संबंधित गणेश मूर्ती तिथून हटवण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले. दिलेल्या मुदतीत कारवाई न झाल्यास आणि संबंधित दोषींवर गुन्हे दाखल न झाल्यास कृषी उत्पन्न बाजार समितीला टाळे ठोकण्यात येईल. त्यानंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीला सर्वस्वी प्रशासनच जबाबदार राहील, असा कडक इशारा शिवसेना नेते शंकर म्हेत्रे यांनी दिला.
बाजार समितीच्या कार्यालयाशेजारी स्वर्गीय सातलिंगप्पा म्हेत्रे यांचा पुतळा बसवण्यासाठी तत्कालीन संचालक मंडळाने चबुतरा उभारला होता, ज्याचे काम सुमारे ८० टक्के पूर्ण झाले होते. मात्र, पंचवार्षिक निवडणुकीत म्हेत्रे यांची बाजार समितीवरील सत्ता गेल्यानंतर, विद्यमान संचालक मंडळाने हा चबुतरा पाडला. बाजार समितीचे सचिव, सभापती, उपसभापती आणि संबंधित संघटनेच्या अध्यक्षांवर ३० जूनपर्यंत गुन्हा दाखल करावा, अन्यथा १ जुलै रोजी आंदोलन करण्याचा इशारा म्हेत्रे समर्थकांनी लेखी पत्राद्वारे प्रशासनाला दिला होता. मात्र, प्रशासनाने कोणतीही कारवाई न केल्यामुळे म्हेत्रे समर्थक रस्त्यावर उतरले होते.
आंदोलनास्थळी अक्कलकोटचे तहसीलदार विनायक मगर, उप विभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र टाकणे, पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावर, तसेच सहाय्यक निबंधक राहुल ठोंबरे, सहाय्यक सहकारी अधिकारी अनिल मदने, सहकारी अधिकारी (श्रेणी २) एस. व्ही. कुंभार आदी अधिकारी उपस्थित होते. या आंदोलनात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शंकर म्हेत्रे, नगराध्यक्ष प्रथमेश म्हेत्रे, नगरसेवक बसवराज हौदे, माजी सभापती आनंदराव सोनकांबळे, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण तानवडे, पंचायत समिती सदस्य गणेश मोरे, बाजार समिती संचालक शिवानंद पाटील, संचालक इरण्णा धसाडे आदींसह बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. सकाळी १२ वा. २० मिनिटांनी सुरू झालेले हे आंदोलन दुपारनंतरही बराच वेळ सुरू होते. या आंदोलनात सुमारे ५०० हून अधिक कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते. काही काळासाठी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यामध्ये ६ पोलीस अधिकारी, ४५ पोलीस कर्मचारी आणि आरसीपी पथकाचे २० जवान तैनात होते. ^स्वर्गीय सातलिंगप्पा म्हेत्रे यांचा चबुतरा बेकायदेशीरपणे पाडून त्या ठिकाणी मंदिर बांधण्याचा प्रयत्न केला जात होता. या संदर्भात म्हेत्रे समर्थकांनी उपनिबंधक कार्यालयाकडे लेखी तक्रार देऊन बाजार समितीचे सचिव, सभापती, उपसभापती आणि संघटनेच्या अध्यक्षांवर ३० जूनपर्यंत गुन्हा दाखल करावा, अन्यथा १ जुलै रोजी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आम्ही लेखी पत्राद्वारे दिला होता. मात्र, प्रशासनाने कोणतीही कारवाई न केल्यामुळे आम्हाला आज रस्त्यावर उतरावे लागले. आता प्रशासनाने येत्या ७ दिवसांत ती गणेश मूर्ती व मंदिर तिथून हटवण्याचे आश्वासन दिले आहे. जर दिलेल्या मुदतीत कारवाई झाली नाही, तर आम्ही दुधनी मार्केट कमिटी पूर्णपणे बंद पाडू. – शंकर म्हेत्रे, शिवसेना नेते
५०० हून अधिक कार्यकर्ते रस्त्यावर, वाहतुकीवर परिणाम
कारवाई झाली नाही तर मार्केट कमिटी बंद पाडू