![]()
राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या यादीनंतर अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असतानाच यवतमाळ जिल्ह्यातून अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. कर्जमाफीच्या यादीत आपले नाव नसल्याचे पाहून मानसिक धक्का बसलेल्या एका शेतकऱ्याने घरी परतल्यानंतर विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना राळेगाव तालुक्यातील भांब येथे घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या समस्येचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव राजू बापूराव चुड्डुके (वय ४९) असे आहे. ते यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील भांब गावचे रहिवासी होते. सरकारने नुकतीच कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर केल्यानंतर ते आपल्या नावाचा समावेश झाला आहे का, हे पाहण्यासाठी बँकेत गेले होते. मात्र, यादीत नाव न दिसल्याने ते प्रचंड निराश झाले. त्यानंतर घरी परतल्यावर त्यांनी विष प्राशन केल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. कर्जाच्या ओझ्यामुळे वाढला मानसिक ताण कुटुंबीयांच्या माहितीनुसार, राजू चुड्डुके यांच्या नावावर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कर्ज होते. याशिवाय चार मायक्रो फायनान्स कंपन्यांकडूनही त्यांनी कर्ज घेतले होते. सततच्या आर्थिक अडचणी आणि कर्जफेडीच्या ताणामुळे ते आधीपासूनच चिंतेत होते. कर्जमाफीच्या यादीत नाव न आल्याने त्यांचा मानसिक तणाव अधिक वाढल्याचे नातेवाईकांनी सांगितले. राजू चुड्डुके यांच्या नावावर मुधापूर उजाड परिसरात सुमारे १ हेक्टर ३९ आर शेती आहे. शेतीवरच कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून होता. मात्र, कर्जाचा वाढता बोजा आणि आर्थिक संकटामुळे त्यांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत गेली होती. उपचारादरम्यान मृत्यू रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास त्यांनी विष प्राशन केल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना तातडीने राळेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन लहान मुले असा परिवार आहे. कर्जमाफीवर पुन्हा प्रश्नचिन्ह राज्य सरकारने अलीकडेच कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली असून अनेक ठिकाणी शेतकरी बँकांमध्ये जाऊन आपले नाव तपासत आहेत. मात्र, काही शेतकऱ्यांची नावे यादीत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. सरकारकडून उर्वरित याद्याही टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध केल्या जाणार असल्याचे सांगितले जात असले, तरी यवतमाळातील या घटनेमुळे कर्जमाफी प्रक्रियेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणाची पोलिसांनी नोंद घेतली असून आत्महत्येचे नेमके कारण आणि इतर परिस्थितीचा तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनेमुळे कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्याचा आणि आर्थिक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. हेही वाचा.. पेपरफुटीचं हे रॅकेट कोणत्या मंत्र्याच्या आशीर्वादाने सुरूय?:MPSC ‘औषध निरीक्षक’ भरतीवरून हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर घणाघात देशभरात ‘नीट’ परीक्षेचा वाद पेटलेला असतानाच, आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) ‘औषध निरीक्षक’ भरतीत पेपरफुटी आणि गुणांमध्ये फेरफार झाल्याच्या दाव्याने राज्यात मोठी खळबळ उडवून दिली आहे. उमेदवारांनी या कथित गैरव्यवहाराचे व्हॉट्सअॅप चॅट्स आणि डिजिटल पुरावे आयोगाला सादर करून चौकशीची मागणी केली आहे. या गंभीर प्रकरणावर राष्ट्रवादीचे नेते महेबुब शेख यांच्यानंतर आता काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. पुराव्यांसह तक्रारी समोर येऊनही सरकार शांत का? असा संतप्त सवाल करत सपकाळ यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सविस्तर वाचा
Source link
यवतमाळ हादरलं:कर्जमाफीच्या यादीत नाव नव्हतं; बँकेतून परतताच 49 वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या