Headlines

रस्ता चुकलेल्या वृद्धेला अवघ्या तीन तासांत पोहोचवले घरी:कुटुंबीय झाले हतबल; एक कॉल आला अन् शोधकार्याला झाली सुरूवात‎




महापालिकेच्या बडनेरा येथील आधार केंद्राच्या चमूने वाट विसरलेल्या एका वृद्ध महिलेला अवघ्या तीन तासांच्या शोध मोहीमेनंतर सुखरुप त्यांच्या घरी पोहोचवले. आधार केंद्रातील कर्मचाऱ्यांची धडपड आणि त्यांच्या परिश्रमाचे यानिमित्ताने कौतुक केले जात आहे. तुळजाबाई गवई असे या वृद्ध महिलेचे नाव आहे. बडनेरा जुना बायपासवरील संजय गांधी नगर क्रमांक दोनच्या त्या रहिवासी आहेत. काही कामानिमित्त सकाळी ९ वाजेच्या सुमारास त्या घराबाहेर पडल्या. परंतु सायंकाळ झाली तरी, त्या न परतल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरु केला. नेहमीची सर्व ठिकाणे पिंजून काढल्यानंतरही त्यांचा शोध लागला नाही. शेवटी पोलिसांत फिर्याद नोंदवण्याची तयारी त्यांनी सुरू केली होती. एवढ्यात त्यांना एक कॉल आला. आजीबाई सुखरुप असल्याचा व त्यांना घेऊन आम्ही घरी येत असल्याचा हा कॉल महापालिकेच्या आधार केंद्रातील कर्मचाऱ्यांनी केला होता. सकाळी घराबाहेर पडलेल्या तुळजाबाई गवई चालत-चालत प्रशांत नगरच्या बगीच्यापर्यंत पोहोचल्या. दरम्यानच्या काळात त्यांच्या पायाला एक खोलवर जखम झाली होती. सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास त्याच भागातील रहिवासी सुचिता कारमोरे यांनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या केवळ स्वत:चे नाव व संजय गांधीनगर याशिवाय काहीही सांगत नव्हत्या. दरम्यान सुचिता कारमोरे यांनी आधार केंद्राच्या चमूला कॉल केला. ‘शुभम कॉलनीच्या गेटजवळ एक आजीबाई बसली आहे. पायाला खोलवर जखम असून, त्या स्वतःला तुळजाभवानी गवई सांगत आहेत’, असा हा कॉल होता. या माहितीनंतर लगेच आधार केंद्राच्या चमूने शुभम नगर गाठून विचारपूस केली. आजीबाई फक्त “संजय गांधी नगर’ एवढंच सांगत होत्या. सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने शोध सुरू केला. रात्री १०.३० वाजता त्यांच्या घराचा ठावठिकाणा लागला. तुळजाबाई आपल्या मुलीकडे, काळपांडे यांच्याकडे राहतात. त्या सकाळपासूनच घराबाहेर पडल्या होत्या. मुलगी पद्माताई व त्यांचे पती रात्री १० वाजता फ्रेजरपुरा पोलिस स्टेशनला रिपोर्ट देण्यासाठी निघाले होते, तेवढ्यातच आजीबाई सुखरूप असल्याची माहिती दिली. निराश्रीत व हतबल झालेल्या नागरिकांसाठी महापालिकेतर्फे चालवले जाणारे हे केंद्र बडनेरा येथे आहे. रेल्वे स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या या केंद्राला अलिकडेच मनपा आयुक्त वर्षा लढ्ढा यांनी भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. तेथे वास्तव्यास असलेल्या निराश्रीत वृद्धांसोबत त्यांनी आपुलकीने संवाद साधून आधार केंद्राच्या चमूबद्दलची मते जाणून घेतली. ही चमू अत्यंत महत्तम कार्य करीत आहे. घरी परतल्यावर आजीबाईला पाहून कुटुंबाला खूप आनंद झाला आणि त्यांनी आधार केंद्राच्या चमूचे व अमरावती महानगरपालिकेचे मनापासून आभार मानले. परिसरातील नागरिकांनीही या तत्पर सेवेबद्दल त्यांचे कौतुक केले. या महत्तम कार्यासाठी सुचिता कारमोरे यांच्यासह ज्योती राठोड, राजीव बसवनाथे, नितीन नांदूरकर यांनी परिश्रम घेतले. वेळेत पोहोचणारा माणुसकीचा हात



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *