अकोले नगरपंचायतीचे नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे यांच्याविरोधात १७ जुलै रोजी सभागृहात १२-० अशा फरकाने अविश्वास ठराव मंजूर झाला आणि अकोल्याच्या राजकारणाला नवे वळण मिळाले. स्वपक्षीय नगरसेवकांची नाराजी आणि त्याला मिळालेली शिवसेना (उद्वव बाळासाहेब ठाकरे) व राष्ट्रवादी (अजित पवार गट) ची अनपेक्षित साथ, यामुळे सत्ताधारी भाजप बॅकफूटवर गेला आहे. रिक्त झालेल्या नगराध्यक्ष पदासाठी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या आदेशानुसार शुक्रवारी (३१ जुलै) सकाळी ११ वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. अवघ्या ६ महिन्यांच्या कालावधीसाठी अकोल्याचा ‘राजा’ कोण होणार, यावरून चौकाचौकांत राजकीय चर्चा रंगल्या आहेत. १७ सदस्यांच्या नगरपंचायतीत ‘वडजे हटाव’ मोहिमेसाठी सत्ताधारी भाजपचा नाराज गट आणि विरोधक एकत्र आले. या नाट्यात शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी यांनी थेट भाजपच्या नाराज गटाच्या पारड्यात वजन टाकले. भाजपच्या माजी नगराध्यक्ष सोनाली नाईकवाडी, कविता शेळके, माधुरी शेणकर, तमन्ना शेख, प्रतिभा मनकर, जनाबाई मोहिते, श्वेताली रुपवते, विमल मंडलिक तसेच नगरसेवक नवनाथ शेटे, सागर चौधरी, आरिफ शेख आणि हितेश कुंभार या नगरसेवकांसोबतच शिवसेना (उबाठा) चे २ आणि राष्ट्रवादीचे २ सदस्य अविश्वासाच्या बाजूने ठाम उभे राहिले. उबाठाच्या या सक्रिय पाठिंब्यामुळेच वडजे यांना पदावरून पायउतार व्हावे लागले. या संपूर्ण घडामोडीत अनुपस्थित राहिलेले ५ नगरसेवक आता कोणती चाल खेळतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे. स्वतः माजी नगराध्यक्ष वडजे, उपनगराध्यक्ष शरद नवले, नगरसेविका शीतल वैद्य व वैष्णवी धुमाळ हे भाजपचे चार सदस्य आणि काँग्रेसचे एकमेव नगरसेवक प्रदीप नाईकवाडी सभेला गैरहजर होते. सूत्रांच्या माहितीनुसार, अविश्वासानंतर भाजपमधून सोनाली नाईकवाडी यांच्या नावावर नगराध्यक्षपदासाठी एकमत होण्याची दाट शक्यता आहे. मात्र, उपनगराध्यक्षपदावर भाजपचेच हितेश कुंभार यांनी दावा ठोकल्याने अंतर्गत गटबाजी उफाळण्याची चिन्हे आहेत. भाजप गटनेत्या तमन्ना शेख या निवडणुकीत व्हीप बजावण्याची शक्यता असली, तरी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या गटनेता यादीवर वडजे, नवले, वैद्य व धुमाळ यांच्या सह्या नाहीत. त्यामुळे हा व्हीप या ४ सदस्यांना लागू होणार नाही. जर या ५ नाराज नगरसेवकांनी शिवसेना (उबाठा) व राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली, तर त्यांचे संख्याबळ ९ वर जाऊन बहुमत सिद्ध करण्याचा राजकीय डावही खेळला जाऊ शकतो. ३१ जुलैचा कार्यक्रम आणि राजकीय हालचाली नगराध्यक्ष निवडीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर झाला. संगमनेरचे उपविभागीय अधिकारी अरुण उंडे हे पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. २७ जुलै : सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज घेणे व दाखल करणे. दुपारी २ वाजता अर्जांची छाननी, तर सायंकाळी ५ वाजेपर्यंत वैध अर्जांची यादी प्रसिद्ध केली जाईल. २८ जुलै दुपारी ४ वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत. ३१ जुलै : सकाळी ११ वाजता विशेष सभेत मतदान, लगेचच मतमोजणी आणि निकालाची अधिकृत घोषणा होईल.
Source link
राजकीय ट्विस्ट:अकोल्यात राष्ट्रवादी, उबाठाचा भाजपच्या नाराज गटाला "हात'; सत्तेचे गणित बदलले