![]()
राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाने पुन्हा एकदा दमदार पुनरागमन केले आहे. जून महिना संपत आलेला असतानाच सुरू झालेल्या या पावसामुळे रखडलेल्या शेतीच्या कामांना आणि पेरण्यांना चांगलाच वेग आला आहे. मुंबईसह उपनगरे, पालघर, भिवंडी आणि हिंगोली जिल्ह्यात आज पावसाचा जोर प्रचंड वाढल्याचे पाहायला मिळाले. या पावसामुळे कुठे वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे, तर कुठे पाणीटंचाईचे संकट टळल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. राजधानी मुंबई आणि लगतच्या परिसरात पावसाचा जोर वाढल्याने मुंबईकरांची तारांबळ उडाली. याचा सर्वाधिक फटका अंधेरी परिसराला बसला असून, मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवेमध्ये २ ते ३ फूट पाणी साचले आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून पोलिसांनी तात्काळ सबवेच्या दोन्ही बाजूंना बॅरिकेट्स आणि रश्श्या लावून तो वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केला आहे. वाहनचालकांना अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचा वापर करण्याची सूचना वाहतूक पोलिसांकडून दिली जात आहे. महापालिकेची धावपळ सबवे बंद झाल्यामुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली असून, पोलीस ती सोडवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे, पालिकेने हाय-स्पीड मोटर पंप लावून सबवेमधील पाणी उपसण्याचे काम सुरू केले आहे. पालघरमध्ये पाणीटंचाईचे संकट टळणार, भातपेरणीला वेग पालघर जिल्ह्यात मान्सून दाखल झाला तरी समाधानकारक पाऊस पडत नव्हता. मात्र, कालपासून पावसाने चांगलाच जोर पकडला आहे. पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचले आहे. जून महिना संपत असताना आलेल्या या पावसामुळे जव्हार, मोखाडा आणि विक्रमगड भागातील पाणीटंचाईचे संकट दूर होण्याची आशा निर्माण झाली आहे. रखडलेल्या भात पेरण्यांनाही आता वेग आला असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. भिवंडीत नागरिकांची तारांबळ भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात दुपारपासूनच ढगाळ वातावरण होते. त्यानंतर सायंकाळी अचानक पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे कामावरून घरी परतणाऱ्या नागरिकांची मोठी धावपळ उडाली. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास भिवंडीतील सखल भागात पाणी साचण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हिंगोलीत हंगामातील सर्वात मोठा पाऊस हिंगोली जिल्ह्यातही पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. औंढा नागनाथ शहरात पावसाने जोरदार धुव्वाधार बॅटिंग केली. यामुळे शहरातील रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले होते. हिंगोली-परभणी मुख्य मार्गावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने वाहनचालकांना पाण्यातून कसरत करत मार्ग काढावा लागला. यंदाच्या हंगामातील हा सर्वात मोठा पाऊस मानला जात असून, यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Source link
राज्यात पावसाची जोरदार हजेरी:मुंबई मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली; तर पालघर, हिंगोलीत शेतकरी सुखावला