Headlines

राष्ट्रवादीच्या आनंद परांजपेंचा सर्व पदांचा राजीनामा:सुनेत्रा पवारांकडे सोपवले पत्र, मोजक्या शब्दांत भावना व्यक्त; शिवसेनेत जाण्याची चर्चा




अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षपद आणि राज्याचे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारून त्यांचा राजकीय वारसा समर्थपणे पुढे नेण्यास सुरुवात केली असली, तरी पक्षात सध्या अंतर्गत राजकारणाला वेग आल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले होते. अशातच आता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि ठाणे समन्वयक आनंद परांजपे यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा पत्राद्वारे थेट सुनेत्रा पवारांकडे सोपवल्याने खळबळ उडाली आहे. आनंद परांजपे यांनी त्यांच्या राजीनाम्याच्या पत्रात लिहिले की, मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सरचिटणीस तथा प्रवक्ता महाराष्ट्र प्रदेश, समन्वयक ठाणे व पालघर (जिल्हा) व पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. आजपर्यंत पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवून पक्ष संघटनेमध्ये अनेक जबाबदाऱ्या दिल्या. त्याबद्दल मी पक्षाचा शतशः आभारी आहे, तरी माझा राजीनामा आपण स्विकारावा ही नम्र विनंती, अशा मोजक्या शब्दांत त्यांनी आपला राजीनामा लिहिला आहे. त्यांच्या राजीनाम्याने पक्षाला मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करताना आनंद परांजपे म्हणाले, मनात अनेक भावना दाटून आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील माझा 14 वर्षाचा प्रवास, सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मिळालेले प्रेम आणि विश्वास कायम स्मरणात राहील. आज अत्यंत जड अंतःकरणाने हा प्रवास इथेच संपवून नव्या वाटेवर पाऊल टाकून नवीन प्रवासाची सुरुवात करीत आहे, असे त्यांनी म्हटले आहे. पक्षात डावलले गेल्याची भावना नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी चढाओढ पाहायला मिळाली, ज्यात पक्षाने झिशान सिद्दीकी यांना संधी दिल्याने ज्येष्ठ नेते आनंद परांजपे नाराज असल्याचे बोलले जात होते. यापूर्वी राज्यसभा आणि आता विधान परिषद अशा दोन्ही महत्त्वपूर्ण निवडणुकांमध्ये संधी नाकारली गेल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ते पक्षात डावलले गेल्याची भावना राजकीय वर्तुळात होती. याच पार्श्वभूमीवर आपली नाराजी व्यक्त करत अखेर त्यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर येत आहे. एकनाथ शिंदेंची घेतली दोनवेळा भेट आनंद परांजपे आता पुन्हा शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असून, गेल्या काही दिवसांत त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दोनदा भेट घेतल्याने या घरवापसीच्या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे. मूळचे शिवसैनिक असलेले परांजपे यांनी शिवसेना एकसंघ असताना पक्ष सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता, मात्र आता बदललेल्या राजकीय परिस्थितीत ते पुन्हा स्वगृही परतण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *