![]()
राहुरीत अवैध गौण खनिज वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकाला धमकावून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. प्रांताधिकारी विनीत शिर्के यांच्या पथकावर २७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पिंपळगाव फुणगी परिसरात हा हल्ला झाला. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रांताधिकारी विनीत शिर्के हे शासकीय वाहनाने (एमएच १७ बीएस ४५००) प्रवरा नदीपात्रातील लिलाव झालेल्या वाळू गटाची पाहणी करून परतत होते. पिंपळगाव फुणगीकडे जात असताना त्यांना मुरूम भरलेला हायवा डंपर आढळला. या डंपरवरील चालक धनराज चौधरी आणि दीपक ऊर्फ प्रवीण बबन लाटे यांच्यासह अन्य व्यक्तींनी धाक दाखवून शासकीय पथकाला रोखले. तसेच वाहनाखाली ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप फिर्यादीत केला आहे. तडीपार आरोपीचा वाळूतस्करीत वावर? चिंचोली-पिंपळगाव शिवारात एका तडीपाराचा वावर असल्याची चर्चा असून, तो वाळूतस्करीत सक्रिय असल्याचे बोलले जात आहे. तडीपारीच्या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याने आणि शासकीय पथकालाच धमकावण्याची हिंमत होत असल्याने अवैध वाळू वाहतुकीला आळा घालणार कोण, असा संतप्त सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
Source link
राहुरीत प्रांताधिकाऱ्यांच्या पथकावर हल्ल्याचा प्रयत्न