Headlines

सतीश चव्हाणांचे 18 वर्षांचे साम्राज्य संपवण्यात माझा खारीचा वाटा:अब्दुल सत्तार म्हणाले- लपूनछपून नाही, उघडपणे पाडले; नवनाथ बन यांच्या टीकेलाही दिले सडेतोड प्रत्युत्तर




“मराठवाडा पदवीधर मतदारसंघात 18 वर्षे आमदार राहिलेल्या सतीश चव्हाण यांनी कोणतेही काम केले नव्हते. त्यामुळे त्यांचे 18 वर्षांचे साम्राज्य संपवण्यात आणि महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या ऐतिहासिक विजयात माझा खारीचा वाटा आहे. मी लपूनछपून नव्हे, तर पहिल्या दिवसापासून उघडपणे सतीश चव्हाणांच्या विरोधात प्रचार केला. मतदान केंद्रांना भेटी देतानाही माझी हीच ठाम भूमिका होती आणि ती आजही बदललेली नाही,” असा मोठा राजकीय गौप्यस्फोट शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केला आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील निकालानंतर माध्यमांशी बोलताना अब्दुल सत्तार यांनी भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांच्या आरोपांचा समाचार घेतला, तसेच पराभवाचे खापर दुसऱ्यावर फोडण्यापेक्षा महायुतीने आत्मपरीक्षण करावे, असा परखड सल्लाही दिला. सतीश चव्हाणांनी 18 वर्षांत काहीच केले नाही सतीश चव्हाण यांच्या पराभवावर बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले, “ज्या दिवशी मतदान सुरू होते, त्या दिवशी मी अनेक मतदान केंद्रांना भेटी दिल्या होत्या. तेव्हाही पत्रकारांनी विचारल्यावर मी स्पष्ट सांगितले होते की, सतीश चव्हाण हे पदवीधरांसाठी किती घातक आहेत. गेल्या 18 वर्षांत आम्ही ज्यांच्यासाठी मते मागितली, त्यांनी पदवीधरांचे कोणतेही प्रश्न सोडवले नाहीत.” जनतेने दिला धडा “सतीश चव्हाणांच्या बदललेल्या रूपामुळे लोकांमध्ये तीव्र नाराजी होती. मतदारांनी ईश्वर आणि अल्लाला साक्षी ठेवून सतीश चव्हाणांना घरी बसवले आणि डॉ. प्रतापसिंह पाटील यांना निवडून दिले. राष्ट्रवादीने चव्हाणांऐवजी दुसरा कोणताही उमेदवार दिला असता, तर कदाचित निकाल वेगळा लागला असता.” प्रतापसिंह पाटलांच्या विजयात वाटा “प्रतापसिंह पाटील आणि त्यांचे वडील वेदप्रकाश पाटील यांच्या विजयात माझा नक्कीच खारीचा वाटा आहे; कारण मी सुरुवातीपासूनच चव्हाणांच्या विरोधात उभा राहिलो.” बनची भणभण काय आहे मला माहीत नाही भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना सत्तार यांनी जुनी आठवण करून दिली. “बनची भणभण काय आहे ते मला ठाऊक नाही, मी त्यांना टीव्हीवरच पाहतो. त्यांना माझ्यावर बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. अवघ्या २ महिन्यांपूर्वी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशाचे पालन करून मी युतीचा धर्म पाळला होता. त्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार संजय शिरसाट यांना निवडून आणण्यासाठी मी स्वतः जीवाचे रान केले होते, हे भाजपने विसरू नये.” “आमच्या पक्षाने विचारले तर आम्ही नक्की उत्तर देऊ, तसेच भाजप आणि राष्ट्रवादीनेही आपल्या उमेदवाराला जनतेने का नाकारले, याचा शोध घ्यावा.” पराभवाचे खापर फोडायला डोके शोधू नका विधानपरिषद निकालांमधील महायुतीच्या पराभवावर सत्तार यांनी स्पष्ट मत मांडले. “नागपूर पदवीधर मतदारसंघात शिवसेनेने भाजपला पूर्ण सहकार्य केले होते. मात्र, निवडणुकीत पराभव झाला की कोणाच्या तरी डोक्यावर खापर फोडण्यासाठी कारणे शोधावी लागतात. त्यातूनच भाजपचे गैरसमज झाले आहेत.” प्रफुल पटेलांचा मुद्दा योग्य “प्रफुल पटेल यांनी जो आत्मपरीक्षणाचा मुद्दा उपस्थित केला आहे, तो अत्यंत योग्य आहे. महायुतीची तिन्ही पक्षांची सत्ता असताना, ५ वेळा निवडून आलेले आणि ४० वर्षांचा राजकीय अनुभव असलेले आमदार असताना पक्षाचे लोक जाहीर विरोध का करतात, याचा विचार वरिष्ठांनी करायला हवा.” सुशिक्षित वर्ग विरोधात का गेला? “मराठवाडा, विदर्भ आणि पुणे या तिन्ही विभागांतील सुमारे ७० टक्के महाराष्ट्रात हा कौल गेला आहे. पदवीधर आणि शिक्षक हा सुशिक्षित वर्ग महायुतीच्या विरोधात का गेला, याचे मंथन झाले पाहिजे,” असे आमदार अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले. ————————————————— हेही वाचा… आम्ही नवा पक्ष स्थापन करून राष्ट्रीय पक्षांच्या नाकात दम आणणार: पराभवानंतर कराळे मास्तरांची घोषणा, म्हणाले- वंजारींनी स्वतः श्रेय घेऊ नये नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी यांनी विजय मिळवला असला, तरी या निवडणुकीत सर्वाधिक चर्चा राहिली ती अपक्ष उमेदवार नितेश कराळे मास्तर यांची. तब्बल २४ हजारांहून अधिक मते घेत त्यांनी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांच्या उमेदवारांच्या तोंडचे पाणी पळवले होते. आता निकाल स्पष्ट झाल्यानंतर नितेश कराळे यांनी माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेसच्या उमेदवाराला त्यांच्या विजयाचे श्रेय घेऊ नका असा टोला लगावला आहे, तर दुसरीकडे स्वतःचा नवा पक्ष स्थापन करून आगामी निवडणुका लढवण्याची मोठी घोषणाही त्यांनी केली आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *