![]()
राहुरी तालुक्यातील पूर्वभागासाठी महत्त्वाचा आणि वरदान ठरलेल्या राहुरी-मांजरी रस्त्याचे काम गेल्या तीन वर्षांपासून संथ गतीने सुरू आहे. हे काम अद्यापपर्यंत अपूर्ण असल्याने परिसरातील विविध गावांचे ग्रामस्थ पुरते वैतागले आहेत. रस्त्यावर सध्या केवळ धुळीचे साम्राज्य पसरले असून, वाहनधारकांना खड्ड्यांतून वाट काढताना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. या निकृष्ट दर्जाच्या कामाची तात्काळ चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. या रस्त्याच्या साईड पट्ट्या भरण्याचे काम सध्या सुरू आहे, मात्र त्यात अत्यंत निकृष्ट दर्जाचा मातीमिश्रित मुरुम वापरला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. साईड पट्ट्यांवर खडी आणि मुरुम दाबताना पाण्याचा अजिबात वापर केला जात नाही. परिणामी, टाकलेली खडी ठिकठिकाणी उखडली असून साईड पट्ट्यांच्या कामाचे पार तीनतेरा वाजले आहेत. रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडल्याने अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. भौगोलिक दृष्ट्या हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण या रस्त्यामुळे नेवासा आणि राहुरी या दोन तालुक्यातील अंतर लक्षणीयरीत्या कमी होते. हा संपूर्ण रस्ता चार टप्प्यांत होणार होता. मात्र, तीन वर्षे उलटूनही अद्याप केवळ एकाच टप्प्याचे काम पूर्ण होऊ शकले आहे. मांजरी ते वळण या टप्प्यातील साईड पट्ट्यांचे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडलेले आहे. मूळ ठेकेदाराने हे काम सोडून ते इतर दुसऱ्या ठेकेदाराला दिल्याने या कामाचा दर्जा साफ घसरल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. कामाची चौकशी करून दर्जा सुधारा ^ या रस्त्याचे काम सुरू असताना काम पुढे आणि दर्जा मागे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. काम अत्यंत सुमार दर्जाचे होत असल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. प्रशासनाने या कामाची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी करावी आणि कामाचा दर्जा सुधारून रस्ता त्वरित पूर्ण करावा. – दादासाहेब विटनोर, ग्रामस्थ, राहुरी पूर्वभाग.
Source link
राहुरी-मांजरी रस्ता डोकेदुखी:तीन वर्षांपासून ग्रामस्थ धुळीच्या साम्राज्यात, कामाची चौकशीकरण्याची मागणी