Headlines

राहुल गांधींची नौटंकीच, विद्यार्थ्यांचे आंदोलन मात्र योग्य:बावनकुळे यांचा पुनरुच्चार, कर्जमाफीसह पोलिस कारवाईवरही दिली माहिती




भारतीय जनता पक्षाचे नेते तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना राज्यातील आणि देशातील विविध महत्त्वाच्या राजकीय व सामाजिक घडामोडींवर सरकारची आणि पक्षाची भूमिका स्पष्ट केली. ‘नीट’ (NEET) परीक्षा पेपरफुटीवरून सुरू असलेले विद्यार्थ्यांचे आंदोलन, त्यात राहुल गांधींचा सहभाग, शेतकऱ्यांची कर्जमाफी, आणि पोलिसांच्या वादग्रस्त कारवाया या सर्वच मुद्द्यांवर त्यांनी सविस्तर उत्तरे दिली. विद्यार्थ्यांचे आंदोलन लोकशाही मार्गाने, पण राजकीय नेत्यांचा स्वार्थ राहुल गांधींनी पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर केलेल्या आंदोलनाला ‘नौटंकी’ म्हटल्याच्या विधानावर बावनकुळे यांनी आज स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, “मी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला नौटंकी म्हटलेले नाही. विद्यार्थ्यांचे आंदोलन हे पूर्णपणे लोकशाही मार्गाने सुरू असून तो त्यांचा हक्क आणि अधिकार आहे. पण, या आंदोलनाच्या आडून राहुल गांधी आणि इतर जे राजकीय नेते स्वतःची पोळी भाजून घेत आहेत, ती नक्कीच नौटंकी आहे आणि ती योग्य नाही.” विद्यार्थ्यांना पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येणार नाही आंदोलक विद्यार्थ्यांशी आपला थेट संवाद झाला असून त्यांचा आपल्यावर विश्वास असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. “या देशाचा युवक आमच्यासाठी सर्वोपरी आहे. माननीय पंतप्रधानांनीही हेच स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांना पुन्हा असा कोणताही मनस्ताप होणार नाही आणि त्यांना पुन्हा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची गरज पडणार नाही, असा मोठा आणि ठोस निर्णय आमचे सरकार लवकरच घेणार आहे. केंद्र सरकारने हा विषय अत्यंत गांभीर्याने घेतला आहे,” अशी ग्वाही त्यांनी दिली. शेतकरी कर्जमाफीची यादी एका महिन्यात पूर्ण होणार राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या कर्जमाफी योजनेवर बोलताना ते म्हणाले की, “राज्य सरकारने शेतकऱ्यांचे तब्बल 36 हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. कर्जमाफीच्या याद्या एकाच वेळी पूर्ण होत नसतात, त्याला थोडा वेळ लागतो. मात्र, येत्या महिनाभराच्या आत या सर्व याद्या क्लिअर केल्या जातील आणि प्रत्येक पात्र शेतकऱ्याला याचा लाभ मिळेल.” शेतरस्ता अडवल्यास मिळणार थेट पोलीस संरक्षण ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या प्रश्नावर सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी दिली. जर गावाकडे कोणी एखाद्या शेतकऱ्याचा शेतरस्ता अडवला किंवा शेतीला पाणी पुरवणारा पाण्याचा रस्ता अडवला, तर अशा बाधित शेतकऱ्याला आता थेट पोलीस संरक्षण दिले जाणार आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. महिला आंदोलकांचा विनयभंग आणि पोलिसांच्या वादग्रस्त भूमिकेवर मुख्यमंत्र्यांचे निर्देश मुंबईतील आंदोलनादरम्यान पोलिसांकडून महिलांचा विनयभंग झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. यावर बोलताना बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली असून दोषींवर अत्यंत कठोर कारवाई करण्याचे थेट निर्देश दिले आहेत. जंतरमंतरवर साध्या वेशातील पोलिसांनी केलेली मारहाण आणि मुंबईत पोलिसांनी विद्यार्थ्यांच्या खिशात ड्रग्ज (पावडर) टाकून आयुष्य बरबाद करण्याची दिलेली धमकी, या दोन्ही गंभीर प्रकरणांवर बावनकुळे यांनी कडक भूमिका मांडली. “या संपूर्ण प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. अशा प्रकारे बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या आणि विद्यार्थ्यांना धमकावणाऱ्या संबंधित पोलिसांवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत,” असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. हे ही वृत्त वाचा मुंबईतील आंदोलनादरम्यान विद्यार्थिनीशी गैरवर्तनाचा आरोप:व्हायरल व्हिडिओवरून विरोधक आक्रमक, पोलिसावर कारवाईची मागणी दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात झालेल्या विविध आंदोलनांदरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. दादरमधील आंदोलनावेळी एका विद्यार्थिनीला पकडताना सिव्हिल ड्रेसमधील पोलिस कर्मचाऱ्याने गैरवर्तन केल्याचा आरोप विरोधी पक्षातील नेत्यांनी केला आहे. या व्हिडिओच्या आधारे संबंधित पोलिस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *