![]()
“राज्यातील बळीराजासमोर दुष्काळाचे मोठे संकट उभे ठाकले असताना महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. आम्ही वचन दिल्याप्रमाणे शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; यासाठीच मंत्रिमंडळाने ही दिवाळी बळीराजाला समर्पित केली असून, दिवाळीपूर्वीच प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यात 5,000 रुपयांची तातडीची अग्रीम मदत वर्ग केली जात आहे. याचबरोबर दुष्काळात शेतकऱ्यांचा छळ करणाऱ्या खासगी सावकार आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांची दादागिरी मोडून काढण्यासाठी शिवसेना तालुका पातळीवर ‘शेतकरी मदत कक्ष’ स्थापन करत आहे,” अशी मोठी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मंत्रिमंडळ बैठकीतील शेतकरी हिताचे निर्णय, आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांची भरती, दुष्काळ निवारण आणि विरोधकांच्या ‘रेजिम चेंज’च्या नॅरेटिव्हचा कडाडून हल्ला चढवला. शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयांची माहिती देताना उपमुख्यमंत्री म्हणाले, “कॅबिनेटच्या बैठकीत दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. सर्व मंत्र्यांनी यंदाची दिवाळी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन साजरी करण्याचा एकमुखाने निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांची दिवाळी कोणत्याही परिस्थितीत काळी होणार नाही, यासाठी मुख्यमंत्री आणि आम्ही कटिबद्ध आहोत.” तातडीची मदत थेट खात्यात “आम्ही राज्यात अधिकृतपणे दुष्काळ जाहीर केला असून, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रत्येकी 5,000 रुपयांची तातडीची मदत मंजूर केली आहे. हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. यानंतर होणाऱ्या पंचनाम्यांनुसार मिळणारी संपूर्ण नुकसानभरपाई आणि इतर सर्व सरकारी सवलतीही शेतकऱ्यांना विनाविलंब मिळतील.” पंतप्रधान मोदींचाही भक्कम पाठिंबा “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आश्वस्त केले असून केंद्र सरकारही बळीराजाच्या पाठीशी उभे आहे. हे डबल इंजिन सरकार शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी सज्ज असल्याने शेतकऱ्यांनी कोणताही टोकाचा विचार करू नये, धीर सोडू नये,” असे भावनिक आवाहन त्यांनी केले. मायक्रो फायनान्स आणि सावकारांना चाप दुष्काळात शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक रोखण्यासाठी शिवसेनेने संघटनात्मक पातळीवर पुढाकार घेतला आहे. “दुष्काळात मायक्रो फायनान्स कंपन्या, बँका किंवा खासगी सावकार शेतकऱ्यांच्या दारात जाऊन जबरदस्तीने कर्जवसुली करत असतील, तर ते खपवून घेतले जाणार नाही. कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही.” मदत कक्षाची भूमिका “शिवसेनेच्या वतीने प्रत्येक तालुक्यात ‘शेतकरी मदत कक्ष’ सुरू करण्यात येत आहेत. ज्यांचे पंचनामे राहिले असतील, केवायसी (KYC) अपूर्ण असेल किंवा सरकारी अनुदानाचा फॉर्म भरण्यास अडचण येत असेल, त्यांना शिवसेनेचे कार्यकर्ते थेट बांधावर जाऊन प्रशासकीय मदत करतील.” ग्रामीण महाराष्ट्रासाठी दिलासा: तज्ज्ञ डॉक्टरांची मोठी फळी सेवेत दाखल राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा दर्जा उंचावण्यासाठी उचललेल्या पावलांचे त्यांनी स्वागत केले. “ग्रामीण आणि दुर्गम भागातील सामान्य जनतेला सर्वोत्तम वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी मोठ्या संख्येने विशेषज्ञ (Specialist) डॉक्टरांची फळी शासकीय सेवेत रुजू झाली आहे. यामुळे महाराष्ट्राची आरोग्य व्यवस्था अधिक सुदृढ आणि बळकट होणार आहे.” आरोग्यमंत्र्यांचे कौतुक या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, आरोग्य राज्यमंत्री आणि त्यांच्या संपूर्ण प्रशासकीय टीमचे जाहीर अभिनंदन केले. रेजिम चेंजवाल्यांना रिजेक्शनची हॅट्रिक! विरोधकांच्या संविधान बचाव मोर्चावर आणि ‘रेजिम चेंज’च्या भाषेवर एकनाथ शिंदे यांनी सडकून टीका केली. “एका हातात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान घ्यायचे आणि दुसऱ्या हाताने सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगासारख्या स्वायत्त घटनात्मक संस्थांवर हल्ले करायचे, हे विरोधकांचे ढोंग आहे. सर्वोच्च न्यायालयावर मोर्चे काढणे, केरळमधील काँग्रेसने सरन्यायाधीशांचा राजीनामा मागणे हा संविधानाचा अवमान आहे.” परकीय शक्तींच्या तालावर नाचणारे घटक “हे लोक देशाला बदनाम करण्यासाठी बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंकेचे दाखले देतात. पण हा 140 कोटी देशभक्तांचा भारत आहे! येथे जनतेचा कौल सर्वोच्च असतो. सत्तेत कोणाला बसवायचे आणि कोणाला हाकलून द्यायचे, हे देशातील सुजाण जनता ठरवते.” ‘नोट चोरी’ करणारे आता ‘वोट चोरी’ ओरडतात “निवडणुकांमध्ये या देशातील जनतेने विरोधकांना सलग 3 वेळा नाकारले आहे. ही ‘रेजिम चेंज’ नसून जनतेने दिलेली ‘रिजेक्शनची हॅट्रिक’ आहे! अनेक वर्षे नोटांची चोरी करणाऱ्यांना आता वोट चोरी दिसत आहे. तुमचे 100 खासदार निवडून आले, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळमध्ये तुम्ही जिंकलात, तिथे वोट चोरी झाली होती का? देशात अराजकता पसरवणाऱ्या या प्रवृत्तींना जनतेच्या दरबारात चोख उत्तर दिले जाईल,” असा घणाघात त्यांनी केला. ——————————————————————— हेही वाचा… ‘गोकुळ’वर शासननियुक्त 4 सदस्यांचा शासननिर्णय!: सतेज पाटील म्हणाले- साडेपाच लाख शेतकऱ्यांचा कौल पायदळी तुडवला; 2029ला हे सगळं लक्षात ठेवू कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून सुरू असलेल्या राजकीय नाट्याला आता राज्य मंत्रिमंडळाच्या एका वादग्रस्त निर्णयामुळे मोठे वळण लागले आहे. गोकुळमध्ये काँग्रेस नेते आमदार सतेज (बंटी) पाटील यांच्या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीला बहुमत मिळालेले असतानाही, महायुती सरकारने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील 3,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या सहकारी संस्थांवर मतदानाच्या अधिकारासह थेट 4 शासननियुक्त (स्वीकृत) तज्ज्ञ संचालक नेमण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे गोकुळच्या अध्यक्ष निवडीतील संख्याबळ बदलून महायुतीचा अध्यक्ष बसवण्याची खेळी रचली गेल्याचा आरोप करत सतेज पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
रेजिम चेंजवाल्यांना जनतेनं रिजेक्शनची हॅट्रिक दाखवली!:एकनाथ शिंदे यांची विरोधकांवर टीका, म्हणाले- शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही