Headlines

रोज हजारो वाहनांची वर्दळ:जुन्या नागपूर-मुंबई महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य; पाणी साचल्याने अपघाताचा धोका, प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी‎




सततच्या पावसामुळे जुन्या नागपूर-मुंबई मार्गाची दुरवस्था झाली असून ठिकठिकाणी पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने रस्त्याला डबक्याचे स्वरूप आले आहे. पाण्यामुळे वाहनधारकांना खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज येत नसल्याने या मार्गावर अपघाताचा धोका प्रचंड वाढला आहे, ज्यामुळे प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सोलापूर-धुळे महामार्गावरील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले चौक पुलाखालून करोडी फाट्यापासून लासूर स्टेशनकडे येणाऱ्या जुन्या नागपूर-मुंबई मार्गावर मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबले आहे. परिणामी, रस्त्यावरील लहान-मोठे खड्डे पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. दुचाकी घसरून छोटे-मोठे अपघात घडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याच मार्गावर पुढे वैजापूरपर्यंत अनेक ठिकाणी रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. ठिकठिकाणी पडलेले खड्डे आणि त्यात साचलेले पाणी प्रवाशांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. तसेच लासूरगावजवळील शिवना नदीवरील पुलावरही मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, पुलावरील प्रवासही अत्यंत धोकादायक बनला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे या प्रमुख मार्गाची अशी अवस्था झाल्याचा आरोप नागरिक करत आहेत. संभाव्य भीषण अपघात टळावा यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने या मार्गाची दुरुस्ती करावी आणि खड्डे बुजवून रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित करावा, अशी आग्रही मागणी स्थानिक नागरिक व वाहनधारकांकडून केली जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *