Headlines

लंडनहून परतलेल्या तरुणीचा पिंपरीतील फ्लॅटमध्ये कुजलेला मृतदेह आढळला!:'झोमॅटो-स्विगी'च्या ट्रॅकिंगवरून उलगडले गूढ




लंडन येथे उच्चशिक्षणासाठी गेलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील 34 वर्षीय मुग्धा अविनाश देशमुख या तरुणीचा मृतदेह पिंपरी-चिंचवडजवळील गहुंजे येथील ‘लोढा बेलमोंडो’ या आलिशान सोसायटीतील एका बंद फ्लॅटमध्ये कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मुग्धा या छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे निवृत्त मुख्य अभियंता अविनाश देशमुख यांच्या कन्या होत्या. जुलै 2025 मध्ये त्या एमबीएच्या शिक्षणासाठी लंडनला गेल्या होत्या. तेथे असताना त्या दररोज घरच्यांशी संपर्कात होत्या. मात्र, 23 ऑक्टोबर 2026 रोजी आईशी त्यांचे शेवटचे बोलणे झाले आणि त्यानंतर त्यांचा संपर्क पूर्णपणे तुटला. संपर्क होत नसल्याने कुटुंबीयांनी लंडन येथील त्यांच्या मैत्रिणीमार्फत चौकशी केली. त्यावेळी मुग्धा यांनी ऑगस्ट 2026 च्या शेवटीच लंडन सोडल्याची धक्कादायक माहिती उघड झाली. भारतात परतल्यानंतरही त्यांनी कुटुंबीयांना याची कोणतीही कल्पना दिली नव्हती. त्यानंतर चिंतेत असलेल्या पालकांनी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात त्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. ऑनलाइन ॲप्सवरून लागला शोध तपासादरम्यान पोलिसांनी मुग्धा यांच्या बँक खात्यांचे व्यवहार आणि डिजिटल फुटप्रिंट्स तपासले. त्यात भारतातील झोमॅटो, ब्लिंकिट आणि स्विगी यांसारख्या ऑनलाइन फूड ॲप्सवर त्यांच्या क्रेडिट कार्डचा वापर सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. यावरून त्या लंडनमध्ये नसून भारतातच असल्याचे निष्पन्न झाले. बंद फ्लॅटमध्ये मृतदेह तांत्रिक तपासावरून पोलिसांचे पथक गहुंजे येथील लोढा बेलमोंडो सोसायटीत पोहोचले. तेथील फ्लॅटचा दरवाजा आतून बंद असल्याने पोलिसांनी बनावट चावीने दरवाजा उघडला. त्यावेळी बेडरूममध्ये मुग्धा यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. शिरगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांच्या माहितीनुसार, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. मुग्धा ऑगस्टपासून या फ्लॅटमध्ये एकट्याच राहत होत्या. त्यांनी 21 ऑक्टोबर रोजी मोलकरणीलाही काम बंद करण्यास सांगितले होते. त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून, वैद्यकीय अहवाल आणि मोबाईलच्या फॉरेन्सिक विश्लेषणानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *