Headlines

पोटच्या मुलाचा गळा आवळून खून केला:पित्याला जन्मठेप; मृत्यूनंतर मुलाचे हाल होतील, या विचाराने 12 वर्षीय मुलाची हत्या




स्वतःच्या १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून केल्यानंतर त्याचा मृतदेह उसाच्या शेतात पुरून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पित्याला जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. विजय आनंदराव खताळ (वय ३५, रा. हिवरे, ता. कोरेगाव) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. मुलाच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेसह पुरावा नष्ट केल्याबद्दल सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षाही न्यायालयाने ठोठावली आहे. सातारा जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. तांबोळी (डीजे-२) यांनी शुक्रवारी (दि. ३०) हा निकाल दिला. या प्रकरणातील आरोपी विजय खताळ याला कॅन्सर झाला असून आपण मरणार आहोत, अशी त्याची समजूत होती. आपल्या मृत्यूनंतर मुलगा विक्रम ऊर्फ प्रणव विजय खताळ (वय १२) याचे हाल होतील, तो अत्यंत गरीब स्वभावाचा आहे, त्यामुळे आपण मरण्यापूर्वीच त्याला मुक्ती द्यावी, असा विचार त्याने केला. त्यातूनच त्याने २३ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी चार ते आठ वाजण्याच्या दरम्यान गोठ्यातील गाईला बांधण्याच्या दोरीने मुलाचा गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह स्वतःच्याच उसाच्या शेतात टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी वाठार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक एस. बी. भोसले यांनी केला. तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सातारा जिल्हा व सत्र न्यायालयात चाललेल्या या खटल्यात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी अभियोक्ता एम. कुलकर्णी आणि तत्कालीन जिल्हा सरकारी अभियोक्ता श्रीमती लकडे यांनी काम पाहिले. खटल्यात एकूण १५ साक्षीदार तपासण्यात आले. परिस्थितीजन्य पुरावे, साक्षीदारांच्या जबान्या तसेच उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यांचे दाखले न्यायालयासमोर सादर करण्यात आले. सरकार पक्षाचा युक्तिवाद आणि उपलब्ध पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरविले. आरोपीला भारतीय दंड विधान कलम ३०२ अंतर्गत जन्मठेप व तीन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद, तर कलम २०१ अंतर्गत सात वर्षे सक्तमजुरी व ५०० रुपये दंड, दंड न भरल्यास १५ दिवस साधी कैद अशी शिक्षा सुनावण्यात आली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *