![]()
येथील नूतन विद्या प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात हिंदी विभागाच्या वतीने हिंदी दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘हिंदी सप्ताहा’चा समारोप व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे डॉ. रवींद्र ठाकरे, प्राचार्य डॉ. आदिनाथ मोरे आणि मंचावरील मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर हिंदी विभागप्रमुख प्रा. बापू शेळके यांनी स्वागतपर प्रास्ताविकात हिंदी सप्ताहाच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला तसेच हिंदी भाषेच्या जागतिक महत्त्वावर प्रकाश टाकला. यावेळी मंचावरील अतिथी तसेच विविध स्पर्धांच्या परीक्षकांचा शाल व स्मृतिचिन्ह देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. सप्ताहभरात आयोजित विविध साहित्यिक व शैक्षणिक उपक्रमांचा सविस्तर अहवाल प्रा. मोनिका अंदोरे यांनी सादर केला. त्यानंतर विविध स्पर्धांच्या निकालांची घोषणा करण्यात आली. प्रमुख पाहुणे डॉ. रवींद्र ठाकरे आणि अध्यक्षीय स्थानावरून प्राचार्य डॉ. आदिनाथ मोरे यांच्या हस्ते गुणवंत विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. सहभागी विद्यार्थ्यांच्या वतीने गायत्री बोराडे हीने मनोगत व्यक्त करताना स्पर्धेतील अनुभव कथन केला. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो, असे तिने नमूद केले. प्रमुख पाहुणे डॉ. रवींद्र ठाकरे यांनी हिंदी ही केवळ संवादाची भाषा नसून रोजगार, तंत्रज्ञान आणि अभिव्यक्तीचे सशक्त माध्यम बनली आहे, असे सांगितले. तरुणांनी आपली भाषिक कौशल्ये अधिक समृद्ध करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन धनश्री गायकवाड व तनुजा देवढे यांनी केले, तर प्रा. पूनम घोटकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. या सोहळ्यास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेच्या संवर्धनासाठी असलेल्या विविध उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
Source link
लासलगावी विविध स्पर्धांतील विजेत्यांचा गौरव:कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र, पारितोषिके देऊन सन्मान