![]()
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात एक अत्यंत मन हेलावणारी घटना समोर आली आहे. ज्या घरात लवकरच लेकीच्या साखरपुड्याची लगबग सुरू होणार होती आणि आई-वडिलांच्या डोळ्यांत मुलीच्या सुखी संसाराची स्वप्ने होती, त्याच घरावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शेतात काम करत असताना विजेचा जोरदार धक्का लागल्याने पती-पत्नीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. भुसावळ तालुक्यातील सुसरी गाव शिवारात घडलेल्या या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अशोक बाबूराव पाटील (वय 55) आणि सरीता अशोक पाटील (वय 43) अशी या मृत दाम्पत्याची नावे आहेत. अशी घडली दुर्घटना अशोक आणि सरीता पाटील हे मजुरांसह सुसरी शिवारातील स्वतःच्या शेतात कांद्याच्या निंदणी आणि खुरपणीच्या कामासाठी गेले होते. यावेळी शेतातील विद्युत खांबाची तार तुटून गवतात पडलेली होती. कामाच्या गडबडीत या तारेचा स्पर्श अशोक पाटील यांना झाल्याने त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. त्यांना वाचवण्यासाठी पत्नी सरीता धावल्या, मात्र त्यांनाही विजेचा धक्का बसला. शेजारील मजुरांनी तातडीने धाव घेत दोघांना वरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. साखरपुड्याच्या आनंदावर विरजण अशोक पाटील यांच्या मुलीचा येत्या 1 नोव्हेंबर रोजी साखरपुडा नियोजित होता. या मंगलकार्यासाठी कुटुंबात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण होते. लेकीच्या आयुष्यातील या महत्त्वाच्या क्षणाची स्वप्ने पाहणाऱ्या आई-वडिलांवर काळाने असा अचानक घाला घातल्याने, क्षणातच आनंदाचे रूपांतर घोर दुःखात झाले आहे. मृत दाम्पत्याच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा आणि वृद्ध आई असा परिवार असून, या घटनेने लेक अक्षरशः पोरकी झाली आहे. पोलिसांकडून तपास सुरू या दुर्दैवी घटनेची नोंद वरणगाव पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक अमितकुमार बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी सुखराम सावकारे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. शेतातील विद्युत तार नेमकी कशी आणि कधी तुटून पडली, याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण सुसरी गावासह पंचक्रोशीत मोठी शोककळा पसरली आहे.
Source link
लेकीच्या साखरपुड्याची लगबग सुरू असतानाच काळाचा घाला:विजेच्या धक्क्याने पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू; भुसावळ तालुक्यातील हृदयद्रावक घटना