![]()
“राज्यातील शेतकरी दुष्काळी संकटाशी दोन हात करत असताना, कोणतीही बँक, खासगी सावकार किंवा मायक्रो फायनान्स कंपनीने सक्तीने कर्जवसुली करता कामा नये. शेतकऱ्याला वेठीस धरून आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या किंवा छळणाऱ्या फायनान्स कंपन्यांवर थेट कलम 302 अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला जाईल. शेतकऱ्यांच्या दारात वसुलीसाठी तगादा लावणाऱ्यांनी थेट सरकारकडे जावे आणि सरकारकडून पैसे घ्यावेत; बळीराजाला नडणाऱ्यांना सरकार अजिबात सोडणार नाही,” असा आक्रमक आणि अत्यंत कडक इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. मंत्रिमंडळाच्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी त्यांनी दुष्काळ निवारणासाठी घेतलेले धोरणात्मक निर्णय, 1.5 कोटी शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी थेट बँक खात्यात 5,000 रुपयांची मदत, ऑगस्ट 2027 पर्यंतचे पाणी व चारा नियोजन, तसेच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या वक्तव्यावर परखड भूमिका मांडली. नांदेडसारखी घटना खपवून घेणार नाही; फायनान्स कंपन्यांवर थेट कलम 302! मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या मनमानी कारभारावर संताप व्यक्त करताना उपमुख्यमंत्री म्हणाले, “नांदेडमध्ये मायक्रो फायनान्स कंपनीने एका शेतकऱ्याला कार्यालयात नेऊन छळले आणि त्यात त्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. त्या फायनान्स कंपनीवर थेट कलम 302 अन्वये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरून सर्व बँका आणि फायनान्स कंपन्यांनी धडा घ्यावा.” सक्तीची वसुली पूर्णपणे बंद “मंत्रिमंडळ बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा झाली असून मुख्य सचिवांना आरबीआय (RBI), सर्व राष्ट्रीयकृत बँका व मायक्रो फायनान्स कंपन्यांशी समन्वय साधण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दुष्काळात शेतकऱ्यांकडे वसुलीसाठी कोणताही तगादा लावता येणार नाही.” शेतकऱ्यांनी घाबरू नये “शेतकऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत खचून जाऊ नये किंवा घाबरण्याचे कारण नाही. कोणीही सक्तीने वसुलीसाठी दारात आल्यास तात्काळ स्थानिक प्रशासनाशी आणि पोलिसांशी संपर्क साधावा. वसुली करणाऱ्यांना थेट सांगावे की सरकारकडे जा आणि तिथून पैसे घ्या.” 1.5 कोटी शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी थेट 5,000 रुपये; एकही लाभार्थी वंचित राहणार नाही! शेतकऱ्यांना मिळणाऱ्या आर्थिक दिलाशाबाबत माहिती देताना त्यांनी स्पष्ट केले. “दुष्काळग्रस्त भागातील सुमारे 1.5 कोटी (1 कोटी 50 लाख) शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीची मदत म्हणून जाहीर केलेले प्रत्येकी 5,000 रुपये दिवाळीपूर्वी जमा होण्यास सुरुवात होईल. ज्या शेतकऱ्यांचे ई-केवायसी अपडेट झालेले नाही, अशा कोणत्याही शेतकऱ्याला लाभापासून वंचित ठेवले जाणार नाही. सर्व पात्र शेतकऱ्यांना ही मदत पोहोचवली जाईल.” विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर “5,000 रुपयांत काय होणार, अशी टीका करणाऱ्या विरोधकांनी हे लक्षात घ्यावे की ही केवळ सणासुदीच्या तोंडावर दिलेली ‘तातडीची’ मदत आहे. दुष्काळ जाहीर झाल्यानंतर मिळणाऱ्या सर्व 12 सवलती आणि नुकसानभरपाईचे इतर सर्व लाभ शेतकऱ्यांना नियमानुसार स्वतंत्रपणे मिळणारच आहेत.” ऑगस्ट 2027 पर्यंत पाणी व चाऱ्याचे नियोजन राज्यातील टंचाई परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी प्रशासनाला निर्देश दिले. “राज्यातील दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन ऑगस्ट 2027 पर्यंत पिण्याचे पाणी, टँकर आणि जनावरांच्या चाऱ्याचे दीर्घकालीन नियोजन करण्याचे आदेश सर्व महापालिका आयुक्त, नगरपालिका मुख्याधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.” मातीचे बंधारे व जलसंधारण “नदीच्या प्रवाहामध्ये मनरेगा (MGNREGS) आणि जलसंधारण विभागाच्या माध्यमातून तात्पुरते मातीचे बंधारे घालण्याचा निर्णय झाला आहे, ज्यामुळे भूजल पातळी वाढेल आणि पिण्याचे व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सुटेल.” चाऱ्याला हमीभाव “गाळपेरा जमिनींमध्ये आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर चारा लागवड केली जाईल. यासाठी आजच्या मंत्रिमंडळ उपसमितीमध्ये चाऱ्यासाठी हमीभाव देण्याचा निर्णय घेण्यात येणार असून, त्यामुळे शेतकऱ्यांना चारा उत्पादनातून आर्थिक नफाही मिळेल.” पंतप्रधानांचा अपमान काँग्रेस नेत्यांना भोवणार काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पालकांवर केलेल्या वक्तव्याचा त्यांनी तीव्र शब्दांत समाचार घेतला. “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या दिवंगत आई-वडिलांवर अभद्र भाषेत टीका करणे हे काँग्रेसचे वैचारिक पतन दर्शवते. 140 कोटी जनता देशाचा विकास करणाऱ्या पंतप्रधानांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून, अशा विकृत टीकाकारांना जनताच योग्य धडा शिकवेल.” पृथ्वीराज चव्हाणांची भूमिका योग्य “काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे समजूतदार नेते आहेत. त्यांनी स्वतः खरगे यांच्या विधानाचा जाहीर विरोध केला आहे. जर काँग्रेसमधील नेतेच अध्यक्षांच्या विधानावर शरमिंदे होत असतील, तर काँग्रेसने तत्काळ खरगे यांची पक्षातून हकालपट्टी करावी.” देशात अराजकता पसरवण्याचा विरोधकांचा डाव “सत्तेविना पाण्याबाहेर काढलेल्या माशासारखी काँग्रेसची अवस्था झाली आहे. परदेशात जाऊन देशाची बदनामी करायची आणि भारतात बांगलादेश, श्रीलंका किंवा नेपाळसारखी अशांतता व अराजकता निर्माण करण्याचा विरोधकांचा कुटील डाव आहे. मात्र हा नवा भारत असून पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली अशा देशविरोधी कारवाया यशस्वी होऊ दिल्या जाणार नाहीत.” ————————————————- हेही वाचा… कर्जमाफी योजनेची 4 लाख 15 हजार शेतकऱ्यांची चौथी यादी जाहीर:दुष्काळग्रस्तांना 5,000 रुपयांची अग्रीम मदत आणि फायनान्स कंपन्यांवर गुन्हे नोंदवण्याचे आदेश राज्यात दुष्काळाचे भीषण सावट असताना हवालदिल झालेल्या बळीराजासाठी राज्य सरकारने ऐन दिवाळीच्या तोंडावर अत्यंत मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026’ अंतर्गत पात्र शेतकरी लाभार्थ्यांची बहुप्रतिक्षित चौथी यादी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. या चौथ्या यादीद्वारे राज्यातील तब्बल 4 लाख 15 हजार शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी होणार असून, त्यांच्या कर्जमुक्तीसाठी सहकार विभागाने 4,000 कोटी रुपयांचा प्रस्ताव वित्त विभागाकडे सुपूर्द केला आहे. याशिवाय, दुष्काळग्रस्त भागातील सुमारे 1.50 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट प्रत्येकी 5,000 रुपयांची अग्रीम मदत याच आठवड्यात जमा करण्याचे महत्त्वपूर्ण आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत दिले आहेत. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या फायनान्स कंपन्यांवर थेट गुन्हा:मंत्रिमंडळ बैठकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सावकार व बँकांना सज्जड इशारा