![]()
वेरूळ लेणी आणि घृष्णेश्वर मंदिर परिसरात वर्षानुवर्षे भाविक, पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना हैराण करणारी वाहतूक कोंडी आता सुटणार आहे. वेरूळ घाटातून १.६५ किलोमीटर लांबीच्या चौपदरी बायपासचे काम सुरू झाले असून, ते पुढील ६ महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन आ
.
वेरूळ लेणी हे जागतिक वारसास्थळ, तर घृष्णेश्वर मंदिर हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असल्याने येथे वर्षभर देश-विदेशातील लाखो भाविक आणि पर्यटक येतात. दररोज सरासरी ७० हजारांहून अधिक वाहनांची वर्दळ वेरूळ परिसरात होत असल्याने कन्नड रोडवर वारंवार वाहतूक कोंडी होते. अपुरी पार्किंग व्यवस्था आणि रस्त्यावर उभी राहणारी वाहने यामुळे भाविकांचा वेळ वाया जात होता.
प्रशासनालाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. वेरूळ घाटात नेहमीच होणारी वाहतूक कोंडी कायमची दूर करण्यासाठी घाटातून बायपास काढण्याचा निर्णय घेण्यात आला. या बायपाससाठी एमटीडीसीकडून आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यात आली असून, त्याबदल्यात शासनाकडून एमटीडीसीला ६ कोटी रुपयांची भरपाई दिली जाणार आहे. हा रस्ता १.६५ किलोमीटर लांबीचा आणि १८ मीटर रुंद असून चारपदरी डांबरी असेल. रस्त्याचे काम ऑक्टोबर २०२६ पर्यंत पूर्ण होण्याचे नियोजन आहे.
६ महिन्यांत काम पूर्ण होईल
वेरूळ बायपासचे काम सध्या जलद गतीने सुरू असून सपाटीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. या रस्त्यामुळे वेरूळ घाट, वेरूळ लेणी आणि घृष्णेश्वर मंदिर परिसरातील वाहतूक कोंडी दूर होणार आहे. पुढील ६ महिन्यांत काम पूर्ण होईल. – एस. जी. केंद्रे, कार्यकारी अभियंता, पीडब्ल्यूडी
रस्त्यावरच पार्किंगमुळे कोंडी
घृष्णेश्वर मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना पार्किंगची सुविधा अपुरी पडत असल्याने रस्त्यावरच वाहने उभी केली जातात. त्यामुळे मंदिरासमोर वारंवार वाहतूक कोंडी होते. परिणामी वेरूळ लेणी ते कन्नड रोडपर्यंत वाहतूक ठप्प होते. बायपासमुळे ही कोंडी कमी होण्याची अपेक्षा आहे.
वेरूळ लेणीसमोर अतिक्रमणामुळे रस्ता अरुंद
वेरूळ लेणीसमोर छोट्या विक्रेत्यांनी अतिक्रमण करून व्यवसाय सुरू केला आहे. दुकाने रस्त्यावर आल्याने रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे पर्यटकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. याच अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी वाढते आणि वेरूळ घाटातही वाहनांच्या रांगा लागतात. बायपासमुळे ही समस्या मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.