![]()
वर्धा जिल्ह्यात उष्णतेचा प्रचंड तडाखा बसत असून तापमानाने ४६.६ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरीसच मे महिन्याची चाहूल लागल्याने नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. जिल्ह्यातील दोन तीन कंपन्यांमुळे व त्यांच्या वाढत्या प्रदूषणाने तापमानात वाढ होत असून, कडक उन्हामुळे दुपारच्या वेळेत रस्ते ओस पडत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सिमेंट रस्ते तयार करण्यात आले आहे. त्याच बरोबर भुगाव देवळी येथील कंपनी मुळे तेथील प्रदूषण वाढत आहेत. रस्ते बांधकाम करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्ष तोड झाल्याने उकाडा जाणवत आहेत. रविवार रोजी दहा वाजताच्या सुमारास चटके लागायला सुरुवात झाली होती. ४६.४अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आल्याने दिवसभर अंगावर भाजणाऱ्या उन्हामुळे बाजारपेठांमध्येही वर्दळ कमी झाली आहे. अत्यावश्यक कामाशिवाय नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत. शेतकरी, मजूर व बांधकाम क्षेत्रातील कामगारांना उष्माघाताचा धोका वाढला असून कामकाजावरही परिणाम होत आहे. अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई जाणवू लागल्याने नागरिकांची गैरसोय वाढली आहे.आरोग्य विभागाने नागरिकांना दुपारी ११ ते ४ या वेळेत बाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उष्णतेमुळे डोकेदुखी, चक्कर येणे, अशक्तपणा यांसारख्या तक्रारींमध्ये वाढ होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे नागरिकांनी पुरेसे पाणी पिणे, हलके व सूती कपडे परिधान करणे तसेच थेट उन्हापासून बचाव करणे गरजेचे आहे. प्रशासनानेही पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था व आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरत आहे. इवोनिथ व महालक्ष्मी या कंपनी मध्ये मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असल्याने तपमान वाढत आहेत.
Source link
वर्ध्यात रविवारी तापमान 46.6 पार:दुपारच्या वेळी रस्ते ओस, जनजीवन विस्कळीत; उद्योगांमधील प्रदूषण तापमानावाढीला कारणीभूत