Headlines

वाढत्या इंधन दरवाढीच्या काळात सासऱ्याची अनोखी शक्कल:अधिक मासात जावयाला दिली घोडी भेट! धाराशिवमधील धोंडे जेवणाची चर्चा




सध्या राज्यभरात अधिक मास म्हणजेच धोंड्याच्या महिन्याचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. या महिन्यात हिंदू परंपरेनुसार जावयाला सासरवाडीकडून अत्यंत विशेष आणि मानाची वागणूक दिली जाते. सासरची मंडळी जावयाला खास भोजनाचे निमंत्रण देतात, त्याचे यथोचित औक्षण करतात आणि आपापल्या ऐपतीनुसार आयुष्यभर लक्षात राहील अशी एखादी खास भेटवस्तू देऊन त्याचा यथोचित सन्मान करतात. याच परंपरेचे औचित्य साधून धाराशिव जिल्ह्यात एका सासरवाडीने आपल्या जावयाला दिलेली एक आगळीवेगळी भेट सध्या संपूर्ण राज्यभरात चर्चेचा विषय ठरली आहे. धाराशिवमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पारंपरिक धोंडे जेवणाच्या कार्यक्रमात सासऱ्याने आपल्या जावयाला चक्क ‘सिंधी’ जातीची एक घोडी भेट म्हणून दिली आहे. सध्याच्या वाढत्या महागाई आणि गगनाला भिडणाऱ्या पेट्रोल दरवाढीच्या पार्श्वभूमीवर सासऱ्याने दिलेली ही अनोखी भेट पाहून उपस्थितही अवाक् झाले. ‘पेट्रोलच्या खर्चापेक्षा घोडीच परवडली,’ अशा मिश्किल प्रतिक्रिया आता नागरिकांमधून व्यक्त होत आहेत. सासरवाडीकडून जावयाला मिळालेली ही हटके भेट पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली असून, संपूर्ण पंचक्रोशीत या अनोख्या धोंड्याची जोरदार चर्चा रंगली आहे. जावयाला घोड्यांची विशेष आवड ईट येथील वकील क्रांतीसिंह राऊत यांचा विवाह कोरोनापूर्वी पारा येथील विलासराव झांबरे यांच्या मुलीशी झाला होता, मात्र त्यानंतर आलेल्या कोरोनाच्या संकटकाळामुळे अधिक मास असूनही सासऱ्याला जावयाचा योग्य तो पाहुणचार करता आला नव्हता. आता सध्या सुरू असलेल्या अधिक मासाचे औचित्य साधून जावयाला सासरी बोलावून सन्मानित करण्याची परंपरा पूर्ण करण्यासाठी झांबरे यांनी क्रांतीसिंह यांना जेवणाचे निमंत्रण दिले. जावयाला घोड्यांची विशेष आवड असल्याचे अचूक हेरून, सासरे विलासराव यांनी केज तालुक्यातील साळेगाव येथील सलमान खान यांच्या माध्यमातून चक्क एक ‘सिंधी’ जातीची घोडी खरेदी केली आणि तीच आपल्या जावयाला अधिक मासाची अनोखी भेट म्हणून देऊन आपली जुनी हौस पूर्ण केली आहे. शेतात येण्या-जाण्यासाठी घोडीचा वापर धोंडे जेवणाचा पाहुणचार पार पडल्यानंतर सासऱ्यांनी जावई क्रांतीसिंह राऊत यांना ही रुबाबदार ‘सिंधी’ जातीची घोडी भेट म्हणून दिली. ‘हौसेला मोल नसते’ या उक्तीप्रमाणे या घोडीच्या किमतीपेक्षा सासऱ्याने जावयाची जपलेली आवड आणि पूर्ण केलेली हौस अधिक महत्त्वाची ठरली आहे. विशेष म्हणजे, क्रांतीसिंह यांची दोन वेगवेगळ्या ठिकाणी शेती असून, आता या शेतांमध्ये ये-जा करण्यासाठी ते याच घोडीचा आवर्जून वापर करत आहेत, ज्यामुळे ही अनोखी भेट त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरली आहे. जावयाची आवड आणि वाढत्या महागाईवर मात सध्याच्या काळात पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे वाढलेले दर सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे नाहीत. मात्र, प्रवासासाठी घोडीचा वापर सुरू केल्यामुळे वकील क्रांतीसिंह राऊत यांचा इंधनावरील मोठा खर्च वाचत आहे. कारण, घोडीला पेट्रोल किंवा डिझेलची गरज नसते, तर तिला केवळ चाऱ्याची आवश्यकता असते. जावयाची आवड आणि वाढत्या महागाईवर मात करणारा हा पर्याय अशा दुहेरी फायद्यामुळे, संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात सध्या या अनोख्या ‘धोंड्याची’ आणि सासऱ्याने दिलेल्या या हटके भेटीची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *