![]()
शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून अंजनगाव बारी सर्कल मधील मूलभूत प्रश्नांवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. जाणता युवा संघटनेचे संस्थापक तथा समाजसेवक गिरीश चौधरी यांनी शनिवारी ६ जून रोजी मासोद येथे अन्नत्याग आंदोलनास सुरूवात केली आहे. या आंदोलनामुळे परिसरात प्रशासकीय अनास्थेविरोधात तीव्र संताप व्यक्त होत असून, नागरिकांनी या आंदोलनाला मोठा पाठिंबा देखील मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या भागातील विकासकामे रखडली असून, वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. मासोद व परिसरातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची चोख व्यवस्था आणि अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था दूर करणे, स्थानिक युवकांच्या आरोग्यासाठी आणि क्रीडा कौशल्याला वाव देण्यासाठी सुसज्ज मैदान उभारणे, महिला बचतगटांसाठी स्वतंत्र भवन निर्माण करणे आणि आवास योजनेतील लाभार्थ्यांना तात्काळ न्याय मिळवून देणे, गावातील स्मशानभूमीचा विकास करणे आणि विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे इत्यादी मागण्या करण्यात आल्या आहेत. आंदोलन सुरू होताच परिसरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक आणि युवकांनी आंदोलनस्थळी भेट देऊन गिरीश चौधरी यांना जाहीर पाठिंबा दर्शवला. यामध्ये प्रामुख्याने अभिषेक उमक, अविनाश मसराम, विशाल नंदनवार, सुरज गवळी, ईश्वर गावंडे, रुपम दहार, गजानन गायगोले, अभिजित चव्हाण आणि प्रज्वल केवतकर यांच्यासह शेकडो नागरिकांचा समावेश होता. “प्रशासनाने नागरिकांच्या या रास्त मागण्यांवर आता तरी तात्काळ पावले उचलावीत, अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली. एक आठवड्या आधीच स्थानिक प्रशासनाला अन्नत्याग आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. शिवराज्याभिषेक दिनासारख्या पवित्र पर्वावर सुरू झालेल्या या आंदोलनामुळे संपूर्ण तालुक्यात आणि सामाजिक माध्यमांवर याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आंदोलनामुळे परिसरातील रखडलेल्या विकासाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, आता प्रशासन यावर काय सकारात्मक निर्णय घेते, याकडे संपूर्ण अंजनगाव बारी परिसराचे लक्ष लागले आहे. प्रशासनाने पोकळ आश्वासन न देचा कामे करावीत नागरिकांना हक्काच्या मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी हे अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. संबंधित विभागांकडे आम्ही अनेकदा निवेदने दिली, पाठपुरावा केला, पण फक्त पोकळ आश्वासने मिळाली आहेत. आता प्रशासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा हे जनआंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार आहे. -गिरीश चौधरी, जाणता युवा संघटना.
Source link
विकास कामे पूर्ण करण्याच्या मागणीसाठी अन्नत्याग आंदोलन:अंजनगाव बारीच्या ग्रामस्थांचा पाठिंबा, विकासकामे करण्याची मागणी