![]()
येथील कलावंत व साहित्यिक आधार संघाच्यावतीने बडनेरा जुनी वस्ती येथे साहित्य सम्राट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमास दलितमित्र उत्तमराव भैसने प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यानिमित्त लोकशाहीरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील साहित्यप्रेमी व सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. यावेळी आधार संघाचे समन्वयक लोककलावंत प्रमोद पोकळे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला. ते म्हणाले की, मराठी साहित्य सम्राट, थोर समाजसुधारक आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील प्रभावी व्यक्तिमत्त्व असलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीच्या आणि आवाजाच्या माध्यमातून दलित, शोषित व वंचित समाजाच्या न्याय आणि हक्कांसाठी प्रभावीपणे लढा दिला. त्यांच्या साहित्यनिर्मितीमुळे समाजात व्यापक जनजागृती झाली असून आजच्या नवपिढीने त्यांच्या विचारांचा वारसा जपून समाजपरिवर्तनासाठी कार्य करणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. कार्यक्रमादरम्यान दलितमित्र उत्तमराव भैसने, गुरुदेव सेवा मंडळाचे महानगर उपसेवाधिकारी रवींद्र बन तसेच गायक प्रकाश वानखडे यांनी गीतरूपी श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी प्रकाश वानखडे, सुभाष सुने, गणेश खंडार, नरेंद्र सपाटे, दिनकर कांडलकर, शिवाजी उंबरकर, मनोज संभे, विजय दारोकर, अरुण महाजन, ओंकार वानखडे, सागर खंडारे, गोपाल भैसणे, किशोर इंगळे, सतिश खंडारे, दीपक चव्हाण, बबलू इंगळे यांच्यासह अनेक कलावंत व साहित्यप्रेमी उपस्थित होते. कार्यक्रमात अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला उजाळा देत त्यांना कृतज्ञ अभिवादन करण्यात आले. पोवाड्यांच्या माध्यमातून मराठी साहित्य समृद्ध केवळ चौथीपर्यंत औपचारिक शिक्षण घेतलेल्या अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या असामान्य प्रतिभेच्या बळावर कादंबऱ्या, कथासंग्रह, लावण्या आणि पोवाड्यांच्या माध्यमातून मराठी साहित्य समृद्ध केले. ‘फकिरा’ या त्यांच्या गाजलेल्या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला असून त्यांच्या अनेक साहित्यकृतींचे रशियनसह विविध जागतिक भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. त्यामुळे त्यांचे साहित्य आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले.
Source link
विचारातून वारसा जपण्याचे आवाहन:अण्णाभाऊ साठे पुण्यतिथीनिमित्त प्रमोद पोकळे, कलावंतांकडून अभिवादन