Headlines

ऑपरेशन कवचअंतर्गत चार कोटींचा गांजा खाक:अमरावती ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई‎




जिल्ह्यातील अमली पदार्थांच्या अवैध उत्पादनासह वाहतूक, साठवणूक, विक्री आणि सेवनाला पूर्णपणे आळा घालण्यासाठी अमरावती ग्रामीण पोलिसांतर्फे ऑपरेशन कवच हे अभियान राबवले जात आहे. या अभियानांतर्गत पोलिसांनी अमली पदार्थांच्या विरोधात कारवाई केली आहे. वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये मागील पाच वर्षात जप्त करण्यात आलेल्या तब्बल ४ कोटी ४५ लाख ८० हजार रुपये किमतीच्या गांजाची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावून त्याची होळी करण्यात आली आहे. ऑपरेशन कवच अंतर्गत संशयित ठिकाणांवर छापे टाकणे, अमली पदार्थांची तस्करी रोखणे, तसेच तरुणांमध्ये जनजागृती व व्यसनमुक्तीचा संदेश देणे यांसारखे उपक्रम राबवले जात आहेत. नागरिकांच्या सहकार्याने गुन्हेगारी रोखून एक सुरक्षित, व्यसनमुक्त आणि सशक्त समाज निर्माण करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. ‘ऑपरेशन कवच’ अंतर्गतच केवळ गुन्हेगारांवर कारवाया न करता, यापूर्वी विविध पोलिस स्टेशनच्या हद्दीत जप्त करण्यात आलेला अमली पदार्थांचा साठा नष्ट करण्याची प्रक्रिया देखील राबवण्यात आली. जिल्ह्यातील एकूण ४७ गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला तब्बल १ हजार ४८६ किलोग्रॅम वजनाचा गांजा, ज्याची अंदाजे किंमत ४ कोटी ४५ लाख ८० हजार रुपये इतकी होती, तो पूर्णपणे नष्ट करण्यात आला आहे. हा साठा नष्ट करण्यासाठी अमरावती ग्रामीण पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली होती. यासाठी ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई’ यांच्याकडून रीतसर परवानगी प्राप्त करण्यात आली. या परवानगीनुसार नागपूर येथील बुटीबोरी एमआयडीसीमध्ये असलेल्या एका कंपनीत या सर्व जप्त मुद्देमालाची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावून तो नष्ट करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेतन कदम, अप्पर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक (पो. मुख्यालय) किरण वानखडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पीआय अशोक लांडे, पीएसआय सागर हटवार आणि इतर पोलिस अंमलदारांनी पार पाडली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *