![]()
चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतील आठ तालुक्यांमध्ये पावसाचे अत्यल्प प्रमाण, पावसातील प्रदीर्घ खंड आणि पिकांवरील रोगांचा वाढता प्रादुर्भाव यामुळे शेतकरी गंभीर कृषी संकटात सापडले आहेत. त्यामुळे ब्रम्हपुरी, जिवती, बल्लारपूर, आरमोरी, देसाईगंज (वडसा), कुरखेडा, कोरची आणि धानोरा या आठही तालुक्यांचा तातडीने दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतील या तालुक्यांमध्ये यंदा पर्जन्यमान कमी राहिले आहे. त्यातच गेल्या महिनाभरापासून पावसाने मोठा खंड दिल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, विशेषतः धान पिकावर खोडकिडा आणि करपा रोगाचा तीव्र प्रादुर्भाव झाल्याचे वडेट्टीवार यांनी पत्रात नमूद केले आहे. रोगाच्या प्रादुर्भावामुळे धानाच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. 8 तालुक्यांचा फेरआढावा घेण्याची मागणी या पार्श्वभूमीवर महसूल आणि कृषी विभागाने चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतील संबंधित 8 तालुक्यांतील पर्जन्यमान, पीक परिस्थिती आणि झालेल्या नुकसानीचा तातडीने फेरआढावा घ्यावा, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे. शासनाने निश्चित केलेल्या दुष्काळाच्या निकषांनुसार या तालुक्यांचा अधिकृत दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा, असेही त्यांनी म्हटले आहे. राज्य सरकारने आतापर्यंत 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. मात्र, चंद्रपूर आणि गडचिरोलीतील वरील तालुक्यांचा त्यात समावेश झालेला नाही. या पार्श्वभूमीवर स्थानिक शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेऊन निर्णय घेण्याची मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे. पिकांचे संयुक्त पंचनामे करण्याची मागणी वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे शेतकऱ्यांसाठी विविध मागण्या केल्या आहेत. बाधित पिकांचे महसूल आणि कृषी विभागामार्फत तातडीने संयुक्त पंचनामे करण्यात यावेत, अशी प्रमुख मागणी त्यांनी केली आहे. तसेच रोगग्रस्त पिकांसाठी शासनाच्या माध्यमातून मोफत औषधे आणि कीटकनाशके उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणीही करण्यात आली आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर प्रति हेक्टरी 20 हजार रुपये विशेष सानुग्रह मदत देण्यात यावी, असे वडेट्टीवार यांनी पत्रात म्हटले आहे. रब्बी हंगामासाठी मोफत बियाणे खरीप हंगामातील नुकसान झाल्याने शेतकऱ्यांसमोर आगामी रब्बी हंगामाचेही आव्हान आहे. त्यामुळे रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदानावर मोफत बियाणे उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. यामुळे आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांना पुढील हंगामाची तयारी करण्यास मदत होईल, अशी भूमिका वडेट्टीवार यांनी मांडली आहे. केवळ कर्ज पुनर्गठन नव्हे, संपूर्ण कर्जमाफीची मागणी शेतकऱ्यांवरील आर्थिक संकट लक्षात घेता त्यांच्या पीक कर्जाचे केवळ पुनर्गठन न करता संपूर्ण कर्जमाफी करावी, अशी मागणीही वडेट्टीवार यांनी केली आहे. तसेच चालू हंगामातील पीक कर्ज वाटपाची अंतिम मुदत 30 ऑक्टोबर 2026 पर्यंत वाढवावी, असे त्यांनी मुख्यमंत्र्यांना सुचवले आहे. प्रलंबित सिंचन विहिरींचे अनुदान जमा करण्याची मागणी मनरेगा अंतर्गत 2023-24 मध्ये मंजूर झालेल्या सिंचन विहिरींचे प्रलंबित अनुदान तातडीने लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे, अशी मागणीही पत्रातून करण्यात आली आहे. सिंचनाच्या सुविधांमुळे भविष्यातील पावसाच्या अनिश्चिततेचा सामना करण्यास शेतकऱ्यांना मदत होऊ शकते, असा मुद्दाही त्यांनी मांडला आहे. प्रत्यक्ष शेतातील परिस्थितीचा आढावा घेण्याचे आवाहन शेतकऱ्यांवर आलेले कृषी संकट गंभीर असून केवळ कागदोपत्री पाहणी करून परिस्थितीचे मूल्यमापन न करता प्रत्यक्ष शेतात जाऊन पीक आणि पावसाची स्थिती तपासावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या अडचणींची तीव्रता आणि स्थानिक जनभावना लक्षात घेऊन शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, असे त्यांनी म्हटले आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतील या 8 तालुक्यांना तातडीने दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना मदतीचा दिलासा द्यावा, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. हेही वाचा…. प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक:आदित्य ठाकरे-संजय राऊत ठाण्यात दाखल; गुन्हेगारांचे नाव FIR मध्ये टाकल्याशिवाय गर्दी हटणार नाही- राऊत ठाण्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची मंगळवारी रात्री गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे ठाण्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मानपाडा परिसरातील क्लस्टर डेव्हलपमेंट आणि राजकीय वर्चस्वाच्या वादातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त होत असून, पूर्णेकर कुटुंबीयांनी ठाण्याच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर या हत्येचे सूत्रधार असल्याचा गंभीर आरोप केला आहे. सविस्तर वाचा….
Source link
विजय वडेट्टीवारांचे फडणवीसांना पत्र:8 तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करा; कर्जमाफी, हेक्टरी 20 हजारांची मदत मागितली