Headlines

विदर्भात पावसाची 75 टक्के तूट:जूनच्या पहिल्या पंधरवड्यात सरासरीच्या तुलनेत भीषण ओढ, चिंता वाढली




विदर्भात जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामाच्या पेरण्या संकटात आल्या आहेत. प्रादेशिक हवामान विभागाच्या १ ते १८ जून २०२६ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, संपूर्ण विदर्भ उपविभागात सरासरीच्या तुलनेत तब्बल ७५ टक्के पावसाची तूट नोंदवली गेली आहे. या कालावधीत विदर्भात सामान्यतः ७९.२ मिमी पाऊस अपेक्षित असताना, प्रत्यक्षात केवळ १९.७ मिमी पाऊस पडला आहे. विदर्भातील सर्व ११ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा ५० टक्क्यांहून अधिक पावसाची घट झाल्याने चिंता वाढली आहे. मान्सूनच्या सुरुवातीला बुलढाणा आणि गोंदिया या जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसला आहे, जिथे ९१ टक्के तुटीची नोंद झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यात ६९.१ मिमीच्या सरासरी विरुद्ध केवळ ६.३ मिमी पाऊस झाला, तर गोंदिया जिल्ह्यात ७७.७ मिमीच्या तुलनेत फक्त ६.७ मिमी पाऊस पडला. गडचिरोली जिल्ह्यातही परिस्थिती गंभीर असून, १०१.३ मिमीच्या सर्वाधिक सरासरीच्या तुलनेत अवघा ११.४ मिमी पाऊस झाल्याने ८९ टक्के घट नोंदवली गेली आहे. वाशीम जिल्ह्यात ८५.५ मिमी ऐवजी १२.९ मिमी पावसाची नोंद झाली असून, तेथे ८५ टक्के तूट आहे. पश्चिम विदर्भातील अकोल्यात ७६.२ मिमी ऐवजी १४.७ मिमी पाऊस पडल्याने ८१ टक्के तुटीची नोंद झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यात ८१ मिमीच्या तुलनेत केवळ १९ मिमी पाऊस झाल्याने ७७ टक्के तूट दिसून येत आहे. वर्धा जिल्ह्यात ७३.७ मिमी विरुद्ध १९.९ मिमी पाऊस झाल्यामुळे ७३ टक्के घट नोंदवली गेली आहे. अमरावती आणि भंडारा जिल्ह्यात परिस्थिती किंचित बरी असली तरी, अनुक्रमे ६७ टक्के आणि ६८ टक्के तुटीची नोंद झाली आहे. अमरावतीत ७३.१ मिमी ऐवजी २४.४ मिमी आणि भंडाऱ्यात ७४.६ मिमी ऐवजी २३.९ मिमी पाऊस पडला आहे. नागपूर जिल्ह्यात ६८.७ मिमी पावसाची आवश्यकता असताना ३०.२ मिमी पाऊस पडला असून, येथे ५६ टक्के तूट आहे. संपूर्ण विदर्भात सर्वात कमी फटका चंद्रपूर जिल्ह्याला बसला असून, तेथे ७७.५ मिमीच्या तुलनेत ३८.४ मिमी पाऊस झाला आहे. चंद्रपुरात ५० टक्के तूट असली तरी, विदर्भातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत हा आकडा सर्वाधिक आहे. एकूणच, संपूर्ण विदर्भात पावसाने ओढ दिल्यामुळे धरणांमधील पाणीसाठा आणि शेतीची कामे पूर्णपणे प्रभावित झाली आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *