![]()
चालू मान्सून हंगामात विदर्भात पावसाची मोठी तूट नोंदवली गेली आहे. जून महिना संपत आला तरी अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. हवामान विभागाने १ ते २४ जून २०२६ या कालावधीसाठी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, विदर्भ उपविभागात सरासरीच्या तुलनेत तब्बल ५४ टक्के पावसाची तूट आहे. या कालावधीत विदर्भात सामान्यतः १२०.४ मिमी पावसाची अपेक्षा असताना, प्रत्यक्षात केवळ ५५.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. विदर्भातील सर्व ११ जिल्ह्यांमध्ये पावसाने सरासरी गाठलेली नाही, ही एक चिंताजनक बाब आहे. पूर्व विदर्भातील गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांची स्थिती सर्वाधिक बिकट आहे. गोंदिया जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत ८२ टक्के, तर नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात ८० टक्के कमी पाऊस झाला आहे. गडचिरोलीत एरवी १५४.१ मिमी पाऊस होतो, पण यंदा केवळ ३०.६ मिमी पाऊस पडला आहे. बुलढाणा जिल्ह्यात ६७ टक्के, भंडारा जिल्ह्यात ६२ टक्के आणि वाशिम जिल्ह्यात ६१ टक्के पावसाची तूट नोंदवली गेली आहे. या जिल्ह्यांमध्येही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पश्चिम विदर्भातील अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यांत ५० टक्के पावसाची घट झाली आहे, तर वर्ध्यात ४५ टक्के तूट आहे. अमरावती आणि उपराजधानी नागपूरमध्ये अनुक्रमे ३२ आणि ३३ टक्के पावसाची तूट कायम आहे. नागपुरात ११२ मिमीच्या तुलनेत ७५.१ मिमी पाऊस झाला आहे. संपूर्ण विदर्भात सर्वाधिक पाऊस चंद्रपूर जिल्ह्यात ८६ मिमी झाला असला तरी, तिथली सरासरी पाहता तोही २९ टक्के कमीच आहे. जूनचा शेवटचा आठवडा सुरू असतानाही पावसाने पाठ फिरवल्यामुळे विदर्भातील पेरण्या खोळंबल्याचे चित्र आहे.
Source link
विदर्भात 54 टक्के पावसाची तूट:जून संपत आला तरी समाधानकारक पाऊस नाही, पेरण्या खोळंबल्या