Headlines

विद्यार्थिनीच्या आत्महत्येप्रकरणी वसतिगृह रेक्टरला अटक:प्राचार्यांसह पाच जणांवर गुन्हा; अन्य संशयितांची चौकशी होणार




सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या वसतिगृहातील १९ वर्षीय विद्यार्थिनीच्या आत्महत्येप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. या प्रकरणात वसतिगृहाच्या रेक्टर जयश्री जकाते यांना पोलिसांनी रविवारी सायंकाळी अटक केली. सोमवारी सायंकाळी त्यांना सातारा जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. विद्यार्थिनीच्या वडिलांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत मुलीच्या आत्महत्येस काही व्यक्ती जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. त्यानुसार पोलिसांनी महाविद्यालयाचे प्राचार्य एस. टी. साळुंखे यांच्यासह समितीतील एकूण पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थिनीच्या वसतिगृहातील वास्तव्याची परिस्थिती, तिला कोणत्या प्रकारचा त्रास झाला होता का, संबंधित व्यक्तींशी तिचे काही वाद किंवा अन्य कारणांमुळे संपर्क आला होता का, यासह विविध बाबींची पोलिसांकडून पडताळणी सुरू आहे. विद्यार्थिनीने आत्महत्येचे टोकाचे पाऊल कोणत्या परिस्थितीत उचलले, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून उपलब्ध माहिती आणि संबंधित व्यक्तींचे जबाब तपासले जात आहेत. रेक्टर जयश्री जकाते यांच्या अटकेनंतर या प्रकरणातील तपासाला महत्त्वाचे वळण मिळाले आहे. गुन्ह्यातील अन्य संशयितांनाही पोलिसांकडून नोटिसा बजावून चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले जाणार आहे. चौकशीदरम्यान संबंधितांकडून घटनेबाबत माहिती घेतली जाणार असून, तपासात सहकार्य न केल्यास कायद्यानुसार पुढील कारवाई केली जाऊ शकते, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, विद्यार्थिनीच्या आत्महत्येमागील नेमके कारण काय होते आणि तिच्या मृत्यूशी संबंधित व्यक्तींची भूमिका कितपत होती, याचा उलगडा पोलीस तपासानंतरच होणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *