![]()
संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानच्या वतीने ठाणे येथील श्रीराम व्यायामशाळा सभागृहात शिक्षकांसाठी ‘नैतिक शिक्षण’ या विषयावर नुकतीच विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मूल्यशिक्षणाची गरज अधोरेखित करणाऱ्या या कार्यशाळेला 105 शिक्षकांची उपस्थिती लाभली. कार्यशाळेच्या प्रमुख पाहुण्या म्हणून संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानच्या सहसंयोजिका सौ. शीतल निकम यांनी मार्गदर्शन केले. आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान देणे पुरेसे नसून त्यांच्यामध्ये सत्य, प्रामाणिकपणा, शिस्त, कर्तव्यभावना, संवेदनशीलता, संस्कार आणि सामाजिक बांधिलकी यांसारखी नैतिक मूल्ये रुजविणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. दैनंदिन जीवनातील विविध उदाहरणे देत त्यांनी शिक्षकांची भूमिका ही केवळ ज्ञान देणाऱ्या व्यक्तीची नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणाऱ्या मार्गदर्शकाची असल्याचे स्पष्ट केले. यावेळी उपस्थित गुरुजनांचा शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी उपस्थित 105 शिक्षकांनी नैतिक शिक्षणाच्या कार्यात तन, मन आणि धनपूर्वक सहभागी होण्याची सामूहिक प्रतिज्ञा केली. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी संस्कारक्षम शिक्षणाची चळवळ अधिक व्यापक करण्याचा संकल्प या कार्यशाळेत करण्यात आला.
Source link
ठाण्यात शिक्षकांसाठी 'नैतिक शिक्षण' कार्यशाळा संपन्न:विद्यार्थ्यांमध्ये मूल्ये रुजविण्याचा 105 शिक्षकांचा संकल्प