Headlines

विद्यार्थ्यांना डायल 112, सायबर सुरक्षेचे धडे‎:पैठणला पोलिस निरीक्षक महादेव गोमारे यांनी विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन




पैठण नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याबरोबरच पोलिसांविषयी मैत्रीपूर्ण भावना रुजविण्याच्या उद्देशाने पैठण पोलिसांनी पोलिस निरीक्षक महादेव गोमारे यांच्या मार्गदर्शनाखाली अनोखा उपक्रम राबविला. महाराष्ट्र शासनाच्या ‘शाळा प्रवेशोत्सव २०२६’ अंतर्गत सोमवारी पैठण ठाण्याच्या हद्दीतील विविध शाळांमध्ये पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी पोलिस निरीक्षक महादेव गोमारे यांनी डायल ११२ व सायबर सुरक्षेचे धडे देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शाळेच्या पहिल्याच दिवशी पोलिसांना आपल्या शाळेत पाहून विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले. प्रथमच शाळेत दाखल होणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी शिक्षक व पालकांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना विविध सामाजिक व सुरक्षा विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तातडीची मदत मिळवून देणारी ‘डायल ११२’ सेवा प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन निरीक्षक महादेव गोमारे यांनी केले. संकटाच्या वेळी या सेवेचा योग्य वापर कसा करावा, याचीही माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. याशिवाय रस्ता ओलांडताना घ्यावयाची काळजी, वाहतूक नियमांचे पालन, हेल्मेट व सीटबेल्टचे महत्त्व, तसेच सुरक्षित प्रवासासाठी आवश्यक खबरदारी याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. डिजिटल युगात वाढत असलेल्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर मोबाईल आणि इंटरनेटचा वापर करताना अनोळखी लिंक, बनावट संदेश आणि ऑनलाइन फसवणुकींपासून सावध राहण्याचे आवाहनही करण्यात आले. लहानपणापासूनच शिस्त, कायद्याचा आदर आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव अंगीकारल्यास भविष्यात सुजाण नागरिक घडतील, असा विश्वासही गोमारे यांनी व्यक्त केला. पैठण येथील शाळेमध्ये पोलिस निरीक्षक महादेव गोमारे यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांत पोलिसांविषयी विश्वास वाढवण्याचा प्रयत्न शाळा प्रवेशोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी सकारात्मक वातावरण निर्माण करणे, पोलिसांविषयीची भीती दूर करणे आणि त्यांच्याशी विश्वासाचे नाते निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे महादेव गोमारे यांनी सांगितले. हा उपक्रम पोलिस अधीक्षक प्रकाश जाधव व अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. यशस्वीतेसाठी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *